खरशिंगाच्या शेंगांची भाजी कशी बनवावी|खरशिंगाच्या शेंगांचीभाजी | Radermachera xylocarpa
जंगलातील भाज्यांना वन्य खाद्यपदार्थ किंवा चारायुक्त हिरव्या भाज्या म्हणूनही ओळखले जाते . या रानभाज्या नैसर्गिकरित्या जंगली भागात वाढतात आणि लोक त्यांचा आपल्या आहारात वापर करत असतात .जंगलातील रानभाज्यांमध्ये विविध प्रजातीच्या भाज्यांचा समावेश होतो . अशा या रानभाज्या बहुतेक वेळा जंगलाच्या जवळ राहाणाऱ्या लोकांच्या आहारचा एक अविभाज्य घटक असतात . हल्ली दळणवळणाच्या सुविधांमुळे शहरांमध्ये सुद्धा अशा रानभाज्या आता सहज उपलब्ध असतात . रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे ,खनिजे आणि अॅंटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात . या भाज्या पोषक तत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे मानवाच्या आहारामध्ये एक अनोखी आणि वैविध्यपूर्ण जोड देतात .
या भाज्यांचा आहारात समावेश करणे हा केवळ पौष्टिक अन्न मिळवण्याचा एक मार्ग नसून निसर्गाशी जवळीक साधता येते आणि इकोसिस्टम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते . रानभाज्या सेवन करण्यापूर्वी त्यांची सकारात्मकता ओळखणे देखील महत्वाचे आहे ,कारण काही रानभाज्या विषारी असू शकतात . त्यामुळे अशा भाज्यांची पूर्ण माहिती असलेल्या व्यक्तीच्या सल्ल्यानेच त्या सेवन कराव्यात .
जेवणात रानभाज्यांचा समावेश केल्याने विविध प्रकारचे स्वाद आणि चवींचा अनुभव घेता येतो . दररोजच्या पदार्थांना एक खमंग स्पर्श जोडता येतो .या भाज्यांचा वापर सूप ,स्टिर फ्राई आणि सॅलड्स अशा अनेक पाककृतींमध्ये करता येतो त्यामुळे जेवणाला एक पौष्टिक आणि अनोखा स्पर्श देता येतो . अलीकडच्या काळात सेंद्रिय आणि शाश्वत जीवन जगण्याची आवड जसजशी वाढत आहे तसतशा जंगलातील रानभाज्या लोकप्रिय होत चालल्या आहेत .
आज आपण या लेखात दुर्मिळ असलेल्या रानभाजीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत . ती रानभाजी म्हणजे खरशिंग . तर खरशिंग शेंगांची भाजी कशी बनवावी याबद्दल माहिती जाणून घेऊया . त्याआधी आपण खरशिंग या वनस्पतीबद्दल माहिती जाणून घेऊया . खरशिंगाच्या शेंगांची भाजी कशी बनवावी
खरशिंग वनस्पतीचे वर्णन/खरशिंग वनस्पतीची ओळख
खरशिंगाच्या झाडाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते . जसे की ,मराठीमध्ये खडशिंगी, खदशिंगी कोकणीमध्ये खरसिंगी,खरसिम्गी ,मल्याळममध्ये वेटंकुराना,वेतांकुराना हिंदीमध्ये सोन पाडर अशा अनेक नावांनी ओळखले जाते . हे झाड अनेक भागात 'पदरी ट्री' तसेच 'टिटवीचे झाड' या नावांनी सुद्धा ओळखले जाते . खरशिंगाचे झाड हे पानझडी वृक्ष प्रकारातील बिग्नोनियासी ( Bignoniaceae ) कुळातील आहे . त्याचे शास्त्रीय नाव राडरमाचेरा झायलोकार्पा ( Radermachera xylocarpa ( Roxb) ) असे आहे .
खरशिंगाचे झाड प्रामुख्याने मध्य भारतातील पानझडी जंगलात आढळते . भारतात हे झाड केरळ , तमिळनाडू तसेच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आणि कोकणामध्ये आढळते . हे एक दुर्मिळ प्रजातीचे झाड आहे . या झाडाची उंची साधारणपणे 10 ते 30 मीटर पर्यंत असते. पाने ही विरुद्ध बाजूने आलेली साधारणपणे 2 फुटांपर्यंत लांब असतात . त्यावरील पत्रके साधारणपणे 6-8 सेमी लांब ,लंबवर्तुळाकार ,तीक्ष्ण टोकदार असतात . खोडावरची साल राखाडी रंगाची ,मऊ व खवले असलेली असते .या झाडाला पाने गळून गेल्यानंतर मार्च ते एप्रिल महिन्यात फुले येतात .
फुले ही शाखांच्या शेवटी दाट आलेली असतात .ही फुले पांढऱ्या रंगाची असून सुवासिक असतात . कपासारखा आतील भाग पिवळ्या रंगाचा असतो . फुलांची लांबी साधारणपणे 5-6 सेमी पर्यन्त असून पाच पाकळ्यांप्रमाणे परंतु कडा पेवा भाजीच्या फुलांप्रमाणे कातरलेल्या असतात .फुलांचा बहर संपल्यानंतर त्यावर फळे म्हणजे शेंगा येतात . मात्र या झाडाला इतर झाडांप्रमाणे मोट्या प्रमाणावर शेंगा लागत नाहीत . संपूर्ण झाडावर तुरळक अशाच शेंगा लागतात .कधी कधी तर एखाद्या झाडावर 2-4 च शेंगा लागलेल्या पाहायला मिळतात. या शेंगा दोन ते तीन सेंमी व्यासाच्या असून साधारणपणे 30 ते 40 सेमी लांबीच्या असतात. शेंगांच्या पृष्ठभागांवर लहान लहान फुगवटे असतात . या शेंगानाच खरशिंगाची शेंग किंवा तिटवीची शेंग असे म्हणतात.शेंगा लांब व खडबडीत असतात . तसेच शेंगेची चव कडू व तुरट असते . खरशिंगाच्या शेंगांची भाजी कशी बनवावी
खरशिंग शेंगेचे उपयोग व औषधीगुणधर्म
जाणकारांच्या माहितीनुसार -----
1) अंगाला गजकर्ण ,खरूज ,नायटा किंवा पुरळ येऊन खाज येत असेल तर त्यावर ही भाजी गुणकारी आहे .
2) पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते .
3) रक्त शुद्धीकरण करण्यास उपयुक्त आहे .
4) पोट साफ करण्यासाठी उपयुक्त आहे .
5) कृमी नाशक म्हणूनही ही भाजी गुणकारी आहे .
6 ) लोणच्यासाठी सुद्धा या शेंगांचा उपयोग केला जातो .
7) मीठात मुरवून ठेऊन उकडीच्या पेजेबरोबर छान लागते .
टीप : रानभाज्यांचा औषधी म्हणून वापर करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा .
खरशिंगाच्या शेंगांची भाजी
शेंगांची भाजी बनवण्याची पद्धत
साहित्य :
खरशिंगाच्या शेंगा ,कांदा ,लसूण , तेल,हळद,मिरची पावडर ,धना पावडर,कारळचे कूट , मीठ इत्यादी.
कृती :
प्रथम शेंगांचे बारीक तुकडे करून घ्यावे . बारीक करून घेतलेले तुकडे गरम पाण्यात उमवून घ्यावेत . उमवून घेतलेले तुकडे थोडा वेळ थंड होऊ द्यावेत. थंड झालेले तुकडे बारीक चुरून घ्यावेत.त्यानंतर त्यात मिरची पावडर ,हळद ,धना पावडर ,चवीनुसार मीठ ,कारळचे कूट टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे . त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यावा . नंतर त्यात लसुण टाका व एकजीव करून घेतलेले मिश्रण टाकून चांगले परतून घ्यावे . गॅस मंद आचेवर ठेऊन झाकण ठेवा व 5-6 मिनिटांनी गॅस बंद करा. Radermachera xylocarpa
Post a Comment