कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे| Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast

 


कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

                 मित्रांनो  कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान , कोकण म्हणजे सह्याद्रीची ओळख, कोकण म्हणजे रानमेव्यांचं  घर, कोकण म्हणजे अथांग समुद्रकिनारा..अशा या स्वर्गमय कोकणात पर्यटनासाठी येताना नेमके कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी असा प्रश्न पर्यटकांना पडल्याशिवाय राहात नाही . कारण येथे सह्याद्री पर्वतांवरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या. हिरवीगार वनराई आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले कोकण नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असते. तर आपण कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांच्या आवडत्या 10 ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


1 ) अलिबाग

                         अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि पुणे येथील पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. येथे तुम्ही खांदेरी,उंदेरी ,कुलाबा या जलदुर्गांना सुद्धा भेटी देऊ शकता.त्याचबरोबर येथून जवळच असलेल्या पोर्तुगीजकालीन रेवदंडा किल्ल्याला सुद्धा भेट देता येते. अलिबागमध्ये तुम्ही चुंबकीय वेधशाळा तसेच सरखेल कान्होजी आंग्रे समाधी या ठिकाणानाही भेट देऊ शकता . येथे वरसोली , कीहीम ,सासवणे , आवास , मांडवा , आक्षी नागाव या प्रसिद्ध बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर अलिबाग बीचवरून समुद्रात असलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यावर तुम्ही फेरी मारू शकता . तसेच येथे विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा आणि उंट सवारी ,घोडे सवारीचा आनंद घेता येतो .येथे खवय्यांसाठी अनेक प्रकारचे सिफूड उपलब्ध असतात . कपल आणि फॅमिली टूरसाठी अलिबाग हे कोकणातील उत्तम असे पर्यटन स्थळ आहे . हे ठिकाण मुंबईवरुन सुमारे 98 किमी अंतरावर आहे तर पुण्यावरून 145 किमी अंतरावर आहे .

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


2 ) दिवेआगर

                                 रायगड जिल्हयात आणि श्रीवर्धन तालुक्यात असलेले दिवेआगर हे स्वच्छ समुद्र किनारा आणि सुवर्ण गणेश मंदिरासाठी ओळखले जाणारे एक विलक्षण पर्यटन स्थळ आहे . या ठिकाणाला भेट द्यायची झाल्यास 3/4 मार्ग आहेत . परंतु तुम्हाला जर समुद्राचा नजारा अनुभवायचा असेल तर मी तुम्हाला दोन मार्ग सुचवेन . एक म्हणजे मुंबईहून मुंबई-गोवा हायवे मार्गे माणगाव मोरबा घाट मार्गे जसवली -श्रीवर्धन- दिवेआगार हा एक मार्ग आहे तर पुण्याहून पौड -मुळशी ताम्हिणी घाटमार्गे माणगाव -मोरबा घाट मार्गे म्हसळा- जसवली- श्रीवर्धन-दिवेआगार असा एक दूसरा मार्ग आहे. मित्रांनो श्रीवर्धनहून दिवेआगर पर्यंतचा प्रवास म्हणजेच नेत्रसुखद मरीन ड्राईव्ह असा आहे. एका बाजूला छोट्या छोट्या टेकड्या ,कौलारू घरांची टुमदार गावं आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र. पश्चिमेकडून भरारणा-या वा-याने आपण ताजेतवाने होऊन जातो आणि सागरी किनारी ब्रेक घेण्याचा मोह आवरता येत नाही . या बीचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा बीच पाच किलोमीटर लांबीचा असून किनारी केवड्याच्या बनाची झालर आहे. तर मागच्या बाजूला माडांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. बीचवरील शुभ्र चंदेरी मखमली वाळू, त्यावरची खेकड्यांची रांगोळी आणि त्यात शंख शिंपल्यानी भरलेले विविध रंग पर्यटकांची मने मोहून टाकतात. या बीचवर तुम्ही विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर खवय्यांसाठी स्थानिक पदार्थ उपलब्ध असतात. येथे तुम्ही सुवर्ण गणेश मंदिराबरोबरच केदारनाथ भैरव मंदिर ,श्री रूपनारायण मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर अशा अनेक मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


3 ) हरिहरेश्वर

                             मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे बाजारपेठेतल्या उजवीकडच्या वळणापासून हरिहरेश्वर सुमारे 53 किलोमीटर अंतरावर आहे. मोरबा घाटातून म्हसळा मार्गे भोस्ते फाटा येथून हरिहरेश्वर येथे जाता येते. हरिहरेश्वर कडे जाणारा घाट रस्ता आपण कोकणात आल्याची जाणीव करून देतो. प्रवास करताना उजवीकडची श्रीवर्धनची नारळ पोफळीची वाऱ्यावर डुलणारी गर्द हिरवाई आणि दूरवरची सागराची निळाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथेच तुम्हाला श्री गणपती व श्री मारुती पाहायला मिळते. या ठिकाणी एक विहीर आहे. त्या विहिरीला 'ब्रह्मकूप' असे म्हणतात. ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने ती खणली अशी भाविकांची श्रद्धा आहे. जवळच तुम्हाला सुमारे 20 फुट उंचीच्या दोन दीपमाळा पाहायला मिळतात. त्यासमोरच श्री हरिहरेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारीच श्री कालभैरव मंदिर पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे प्रथम कालभैरवाचे दर्शन नंतर हरिहरेश्वर दर्शन घेऊन मग गणपती व नंदी सह दीड प्रदक्षिणा घालून परत कालभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. दर्शन घेतल्यावर मंदिर परिसरातूनच लहू परिक्रमा व दीर्घ परिक्रमा मार्ग सुरू होतो. परंतु भाविकांनी या परिक्रमा करताना भरतीओहोटीचे गणित साधून सावधानता बाळगावी. येथील समुद्र कायमच उसळता असतो. पर्यटकांच्या फाजील धाडस आणि बेसावधपणामुळे या समुद्रकिनाऱ्यावर अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. परंतु श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर हे पुरातन पेशवेकालीन मंदिर आहे. त्यामुळे हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथील समुद्रकिनाऱ्या बरोबरच तुम्ही सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अगस्ती गुहा या ठिकाणाला सुद्धा भेट देऊ शकता. संध्याकाळी समुद्रात सूर्याचे प्रतिबिंब पडून सोनेरी झालेल्या जलराशी पहात आपण या ठिकाणी हरवून जातो. त्या डुबत्या भास्कराच्या साक्षीने आपलाही सहलीचा दिवस सुखद आठवणींनी संपत असतो.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


4 ) दापोली 

                                          दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून ते एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. हे ठिकाण दापोली कॅम्प म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ याच ठिकाणी आहे. आपण जर कोकणच्या टूरवर असाल तर या विद्यापीठाला आवर्जून भेट द्या. या पर्यटन स्थळाबद्दल बोलायचे झाल्यास येथील टुमदार घरे,मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका मारताना नजरेस पडणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य या ठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे. हेच सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. येथील थंडगार हवेमुळे या शहराला 'मिनी महाबळेश्वर ' म्हणूनही ओळखले जाते. सुंदर समुद्रकिनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात घिरट्या घालणारे 'सी- गल' पक्षी , मधुनच दर्शन घडविणारे डॉल्फिन, मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले अशा अनेक गोष्टींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही हरणे बंदर, कड्यावरचा गणपती ,श्री केशवराज मंदिर, मुरुड बीच ,पन्हाळेकाजी लेणी, सुवर्णदुर्ग किल्लाअशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 215 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यापासून हे ठिकाण भोर घाट मार्गे सुमारे 186 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुळशी पौड मार्गे सुमारे 196 किलोमीटर अंतरावर आहे.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast



5 ) गणपतीपुळे


                                      सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, नारळ पोफळीच्या हिरवळीने नटलेल्या आणि निसर्गाची अप्रतिम उधळण, स्वच्छ ,सुंदर ,रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा म्हणजेच गणपतीपुळे. कोकणातील हे ठिकाण श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध बनले आहे. मंदिरातील मूर्ती ही पश्चिमाभिमुख असून डोंगराळ भागात विराजलेली आहे. त्यामुळे तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. मंदिराबरोबरच या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. येथील समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही विविध वॉटर स्पोर्ट्स बरोबर उंट सवारी ,घोडे सवारी इत्यादी क्रियाकल्पाच्या आनंद घेऊ शकता. येथे आल्यावर तुम्ही मंदिर आणि बीच बरोबरच प्राचीन कोकण संग्रहालय, नेवरे गावाजवळील सुरुचे बन व बीच, मालगुंड गावातील केशवसुत यांचे स्मारक अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता . गणपतीपुळे येथून रत्नागिरीच्या दिशेने जाताना आरे- वारे या सनसेट पॉइंटचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. 'नवरा माझा नवसाचा' आणि 'फुल थ्री धमाल' या चित्रपटांचे चित्रीकरण गणपतीपुळे येथे झाले होते. त्यामुळे हे ठिकाण अधिकच लोकप्रिय बनले आहे. येथील बीचवर तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थांबरोबर शहाळीचे पाणी आणि विविध प्रकारच्या सी-पुडचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 375 किमी अंतरावर आहे. तर पुण्याहून भोर घाटमार्गे सुमारे 288 किलोमीटर अंतरावर आहे.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


6) रत्नागिरी


                                  रत्नागिरी हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेले भारतातील एक प्रमुख बंदर आहे. कोकणात सात महत्त्वाचे दीपगृह आहेत. त्यापैकी एक दीपगृह येथे आहे. मित्रांनो रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा, काजू ,नारळ आणि भात इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यस्थळ म्हणूनही ओळखले जाते. एवढेच नाही तर रत्नागिरी ही परशुराम, वरदमुनी यांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी हिवाळ्यात अनुकूल हवामान असते . त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वोत्तम मानले जातात. येथील लोक नमन ,दशावतार, झाकरी,फुगडी, शक्ती तुरा आणि गवळण यासारखे कोकणी संस्कृतीशी संबंधित लोकनृत्य सादर करतात. मित्रांनो पर्यटनासाठी रत्नागिरीमध्ये आल्यास आपण टिळक स्मारक ,थिबा पॅलेस ,रत्नदुर्ग किल्ला, दीपस्तंभ, भगवती मंदिर, भाटे बीच आणि मांडवी बीच अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सी फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर मांडवी बीचला आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला सी फूड बरोबरच रिच करी ,कोकम करी ,कोंबडी वडे ,चिकन, आंबोळी, सांदण आणि मावणी मटन अशा अनेक स्थानिक खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता येईल.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast



7 ) देवबाग 


                                   देवबाग हे महाराष्ट्रातील मालवणच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेले एक छुपे रत्न म्हणायला काही हरकत नाही.हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण आहे.हा सुंदर आणि नयनरम्य बीच तारकर्ली बीचला लागूनच आहे . येथे तुम्हाला कर्ली नदी व अरबी समुद्राच्या पाण्याचा संगम देखील पाहायला मिळतो . संगमानंतर या ठिकाणाला मोबर पॉइंट या नावाने ओळखले जाते . इथली पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ निळे पाणी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. या बीचवर तुम्हाला सीगल पक्ष्यांचे थवे बघण्याचा आनंद घेता येईल. एवढेच नाही तर तुम्ही या ठिकाणी वॉटर स्कूटर , स्कुबा डायव्हिंग , जेट स्किइंग, बंपर राईड, डॉल्फिन बोट राईड, स्काय बोटिंग, पॅरासेलिंग अशा अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. या बीचवर संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. येथे नैसर्गिक सौंदर्य तर आहेच ,परंतु त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही येथे अस्सल मालवणी पाककृतीचा आस्वाद घेऊ शकता. येथून जवळच असलेल्या त्सुनामी बेटाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता .

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


8 ) वेंगुर्ला


                                     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या या शहराला संपन्न अशी परंपरा लाभलेली आहे. पूर्वी हे शहर एक व्यापारी बंदर म्हणून ओळखले जायचे. परंतु आता हे शहर एक मासेमारी बंदर आणि पर्यटनामुळे प्रसिद्धीस आले आहे. कमी प्रदूषित समुद्रकिनाऱ्यांमध्ये या ठिकाणाची आता गणना केली जात आहे. या ठिकाणी कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृह पैकी एक दीपगृह पाहायला मिळते. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले हे शहर वेगाने विकसित होणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्करआणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे हे जन्मगाव . आपण जर वेंगुर्ला टूरवर असाल तर वेंगुर्ला बीच ,वेंगुर्ला जेट्टी, वेंगुर्ला लाईट हाऊस, शिरोडा बीच, मोचेमाड बीच, सागरेश्वर बीच ,कोंडुरा बीच ,खवणे बीच अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊन मनसोक्त आनंद घेऊ शकता. जर तुम्ही वेंगुर्ला बीचवर असाल तर या ठिकाणी तुम्हाला अनेक मच्छीमार त्यांच्या वस्तू विकत असतानाच दृश्य पाहायला मिळतं. एवढेच नव्हे तर वेंगुर्ला येथे तुम्ही खडकावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत मासेमारी करतानाचे दृश्य पाहू शकता . येथून दीपगृहाच्या पायऱ्या जवळच असल्यामुळे तुम्ही दीपगृहाला सुद्धा भेट देऊ शकता. त्याचबरोबर वायंगणी हा बीच पांढऱ्या वाळूचा आणि सौम्य उतार असलेला सुंदर असा बीच आहे. तुम्हाला जर पाण्यात खेळायचे असेल तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. येथे कमी पर्यटक भेट देत असल्यामुळे शांतपणे आनंद लुटता येतो. परंतु उतार असल्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या पर्यटनस्थळांचा आनंद घेतल्यानंतर काजू आणि काजूपासून बनवलेल्या पदार्थांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यामुळे काजूपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast



9 ) तारकर्ली


                                   तारकर्ली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक प्रसिद्ध बीच आहे. हा बीच कोकणातील क्वीन बीच म्हणून ओळखला जातो.त्यामुळे परदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण बनले आहे . हा बीच मालवणच्या दक्षिणेस कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर स्थित आहे . पांढरी शुभ्र वाळू आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हा बीच खूपच प्रसिद्ध आहे . हा बीच त्याचे प्राचीन सौन्दर्य अजूनही टिकवून आहे . येथील पांढरी वाळू ,स्वच्छ निळे पाणी आणि सुरूची झाडे या बीचची शोभा वाढवतात . बीचवरील बांबूची आणि सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते .येथे तुम्हाला अधूनमधून डॉल्फिन व कासवांचे दर्शन होते .येथे संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते . संध्याकाळच्या पसरलेल्या प्रकाशात या बीचचे सौन्दर्य अधिकच खुलून दिसते . या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो .

Top 10 Famous Tourist Spots on Konkan Coast


10 ) मालवण

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणी पदार्थांसाठी खूपच लोकप्रिय आहे . मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांत प्रसिद्ध व श्रीमंत तालुका समजला जातो . या ठिकाणाच्या पूर्वेला पश्चिम घाट तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे . मालवणमधील समुद्र किनारे असोत किंवा घनदाट जंगले असोत येथे येणाऱ्या पर्यटकांना खिळवून ठेवण्याची क्षमता मात्र त्यांच्यामध्ये नक्की आहे . येथील पर्यटन स्थलांबद्दल बोलायचे झाल्यास येथे सिंधुदुर्ग किल्ला ,रामेश्वर मंदिर ,वागेश्वर मंदिर ,विजय दुर्ग ,शिवसमुद्र संग्रहालय ,कुणकेश्वर मंदिर आणि बीच ,सागरी वन्यजीव अभयारण्य ,महापुरुष मंदिर ,नवदुर्गा मंदिर , देवबाग बीच आणि त्सुनामी बेट अशा एका पेक्षा एक सरस आणि पर्यटकांना आकर्षित करणा-या पर्यंटनस्थळांना तुम्ही भेट देऊ शकता . तुम्ही जर मालवणच्या टुरवरअसाल आणि तुम्हाला जर सिफूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर मालवणी तिकला , कोलंबीचे सार , खेकड्याचा मसाला ,भाजलेले पापलेट , बांगड्याचे सार ,सुरमईचे सुके असे अनेक प्रकारचे सिफूड मालवणी पद्धतीने बनविलेले उपलब्ध असते .येथील मालवणी मसालेही प्रसिद्ध आहेत . त्याचबरोबर विविध प्रकारचे जाम , आमरस,आंबापोळी , फणसपोळी ,काजुगर ,आंबावडी , कोकम सरबत ,तळलेले फणसाचे गरे आणि मालवणी खाजा अशा अनेक प्रकारच्या स्थानिक खाद्य पदार्थांचाही आस्वाद घ्यायला विसरू नका .


हे सुद्धा वाचा : पाली - सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे 






No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.