भारंगी भाजी रेसिपी व औषधी उपयोग| Bharangi Benefits and Uses| भारंगी भाजी कशी बनवावी ?

 

भारंगी भाजी रेसिपी व औषधी उपयोग| Bharangi Benefits and Uses| भारंगी भाजी कशी बनवावी ?


Bharangi Bhaji


मित्रांनो आपण नेहमीच आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करत असतो. या भाज्यांपैकी काही भाज्या या शेतामध्ये उत्पादित केल्या जातात तर काही भाज्या या जंगलामध्ये आपोआपच उत्पादित होतात. पावसाळा सुरू झाला की अशाच अनेक प्रकारच्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि लोकही त्या आवडीने खातात. कारण या भाज्यांमध्ये शरीरासाठी मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. बऱ्याच लोकांना रानभाज्या कशा बनवाव्यात याची माहिती नसते. त्यामुळे असे लोक या रानभाज्या बनवून खात नाहीत. अशा लोकांसाठी आपल्या या वेबसाईटवर जंगलातील रानभाज्या कशा बनवाव्यात याबद्दलची माहिती मिळत राहणार आहे. अशाच एका रानभाजीची म्हणजेच भारंगी या रानभाजी बद्दलची माहिती व ती भाजी कशी बनवली जाते व तिचे औषधी गुणधर्म काय आहेत . याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमधून आपण पाहू या .
    भारंगी ही एक रानभाजी असून ती आपल्याला शेताच्या बांधावर ,खुरट्या जंगलात तसेच डोंगर उतारावर, नदी नाल्यांच्या काठावर पाहायला मिळते. या वनस्पतीचे झुडूप साधारणपणे तीन ते चार फुटांपर्यंत वाढते. ही वनस्पती व्हर्बेनेसी (Verbenaceae) या कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेरोडेंड्रम सिरेटम (Clerodendrum serratum) असे आहे . ही भाजी कोकणात मुबलक प्रमाणावर आढळते .

    Bharangi Bhaji


    वनस्पतीचे वर्णन

    या वनस्पतीच्या फांद्या चौकोनी स्वरूपाच्या असतात. तर पाने दोन्ही टोकाकडे निमुळती ,टोकदार आणि त्याच्या कडा कातरलेल्या असतात. तसेच साधी, समोरासमोर आलेली व लंबवर्तुळाकार स्वरूपात असतात. या वनस्पतीला फुले व फळे ही पावसाळ्याच्या अखेरीस येतात. फुले ही निळसर पांढरी असून ती फांदीच्या टोकावर मोठ्या पुंजक्याने आलेली असतात. पाकळ्या निळसर पांढऱ्या असतात तर त्यांचा खालचा भाग गर्द निळा असतो. तर फळे ही चार गोलाकार भागात विभागलेली गोल, चकचकीत अशी असतात . फळे ही काळसर जांभळी असून त्यामध्ये मांसल, काळसर रंगाच्या दोन चार बिया असतात.

    भारंगी भाजीचे औषधी गुणधर्म :

    1) भारंगीचे मूळ हे दम्याच्या आजारावर बेहडा व अडुळशाच्या पानांत टाकून त्याचा काढा बनवून प्यायला देतात.
    2) पोटात जंत झाल्यास भारंगीची पाने उकळून ते पाणी पिण्यासाठी देतात.
    3) ज्वर किंवा कफ असल्यास अशा आजारांवर भारंगीचे मूळ उपयोगी आहे .
    4) भारंगीची भाजी पाचक असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.
    5) दमा होऊ नये म्हणून भारंगीची भाजी खाल्ली जाते.
    6) पोट साफ न होणे , सर्दी ,खोकला,पोट जड होणे ,ताप, कफ घट्ट होणे ,तोंडाला चव नसणे अशा आजारांवर भारंगीची भाजी गुणकारी आहे .

    Bharangi Bhaji



    भाजी बनवण्याची पद्धत


    1)भारंगीच्या पानांची भाजी :

    साहित्य : भारंगीची कोवळी पाने, 2 कांदे, लसुण , मिरची पावडर ,हळद ,जिरे ,मोहरी ,तेल,मीठ इत्यादी

    कृती :

    प्रथम भारंगीची कोवळी पाने बारीक चिरून घ्या. नंतर एका पातेल्यात बारीक चिरून घेतलेली भाजी गरम पाण्यात पाच मिनिटे उकळून घ्या. उकळून घेतलेली भाजी थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर थंड झालेली भाजी हाताने व्यवस्थित पिळून घ्या. भाजी पिळून घेतल्यानंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यात लसूण, जिरे ,मोहरी टाकून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. त्यावर पिळून घेतलेली भाजी घालावी व वरुन मिरची पावडर ,हळद टाकून ते एकजीव करून घ्या . नंतर त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी व चवीनुसार मीठ टाकावे . पाच - दहा मिनिटे भाजी शिजवून घ्यावी .


    2)भारंगीच्या फुलांची भाजी :

    साहित्य : 2-3 वाट्या भारंगीची फुले ,2 कांदे ,लसूण , हिरवी मिरची , हळद, जिरे, मोहरी, तेल,मीठ , मुगडाळ इत्यादी .

    कृती :
    प्रथम फुले स्वच्छ पाण्याने धवून घ्या . नंतर गरम पाण्यात उकळून व पिळून घ्या. उकळून घेतलेली फुले पिळून घेतल्यानंतर कढईत तेल गरम करा व त्यात चिरलेला कांदा,जिरे . मोहरी व लसूण तेलात परतून घ्या . नंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची टाका .हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यात पिळून घेतलेली फुले व मुगडाळ टाका व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. वरुन झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवून घ्या . भाजी शिजून कमी होते . झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ टाका व पुनः झाकण ठेवून भाजी थोडावेळ शिजवून घ्या .

    निष्कर्ष :

    थोडक्यात सांगायचे झाले तर भारंगी ही रानभाजी शरीरासाठी बहुगुणी अशी रानभाजी आहे. ही भाजी सर्दी ताप ,दमा, खोकला ,पोट जड होणे ,पोटातील जंत अशा अनेक आजारांवर उपयोगी आहे. या वनस्पतीची केवळ पानेच उपयोगी नसून फुले आणि मुळे सुद्धा उपयोगी आहेत . एकंदरीत ही वनस्पती आपल्या शरीरासाठी बहुगुणी आहे.


    FAQ : Bharangi Benefits and Uses| भारंगी भाजी कशी बनवावी ?

    1) मी या वनस्पतीची लागवड घरी करू शकतो का ?
    _होय , या वनस्पतीची लागवड मुळांपासून व बियांपासून करता येते .

    2) भारंगीची भाजी सर्दी व कफ यावर गुणकारी आहे का ?
    _ होय , ही भाजी सर्दी व कफ यावर गुणकारी आहे .

    3) भारंगीची भाजी किती प्रकारे करता येते ?
    _ ही भाजी कोवळ्या पानांची व फुलांची अशा दोन प्रकारे करता येते .

    4) भारंगीची भाजी कोणकोणते पदार्थ टाकून केली जाते ?
    _ भारंगीची भाजी मुगडाळ व्यतिरिक्त चनाडाळ ,उडीद डाळ , तुरडाळ तसेच साल न काढता वाल सुद्धा टाकून छान बनवता येते .

    No comments

    ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

    Powered by Blogger.