कुरडू भाजी कशी बनवावी ? | कुरडू भाजीचे फायदे |Kurdu bhaji benefits in Marathi|
कुरडू भाजी कशी बनवावी ? | कुरडू भाजीचे फायदे |Kurdu bhaji benefits in Marathi
मित्रांनो कुरडू ही एक अशी वनस्पती आहे ,जी पाऊस पडल्यावर आपल्याला माळरानावर, शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर उगवलेली सहज दिसून येते. साधारणत: ही वनस्पती माठासारखी दिसत असल्यामुळे ओळखणे सहज सोपे जाते. या वनस्पतीला सेलोशिया अर्जेन्शिया (celosia argentea) असे लॅटिन नाव आहे ,तर संस्कृतमध्ये या वनस्पतीला शितीवारअसे म्हटले जाते . ही वनस्पती कुरडू, हरळू, पांढरा कोंबडा, मोर पंख अशा नावाने सुद्धा ओळखली जाते. ही वनस्पती ॲमरॅन्टेसी ( Amaranthaceae) या कुळातील असून रानभाजी म्हणून लोकांची आवडती भाजी आहे. .या वनस्पतीची पाने गोलाकार, साधी ,विविध एका आड एक असतात. तर काही वनस्पतींची पाने लांबट व निमुळती आकाराची हिरव्या रंगाची असतात. या वनस्पतीचे खोड पांढरट व तांबूस रंगाचे व फांद्या पन्हाळीदार असतात . तर फुलांचा रंग पांढरा असून वरील भाग गुलाबी रंगाचा असतो. या वनस्पतीला फुले येण्याचा कालावधी साधारणपणे ऑक्टोबर- नोव्हेंबर असा असतो . या वनस्पतीची फुले पुंजक्याने येत असून टोकाकडे ती शंकूच्या आकाराची होत जातात. या फुलांमध्ये काळ्या रंगाच्या चापट चकचकीत कडक बिया असतात. पावसाळ्यात ही वनस्पती लोकांच्या आहारातील एक आवडती भाजी आहे. आयुर्वेदानुसार ही एक औषधी वनस्पती आहे.तर ही भाजी कशी बनवायची याची माहिती आपण या लेखात आपण पाहणार आहोत . त्या आधी आपण या वनस्पतीचे औषधी गुणधर्म समजून घेऊ .
ही वनस्पती थंड गुणधर्माची असल्यामुळे शरीरातील वाढलेली उष्णता कमी करणारी आहे . कुरडू भाजीमध्ये लोह ,झिंक ,पोटॅशियम इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात असतात . मुतखड्यावर व लघवीच्या विकारावर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे.रक्ती मूळव्याध ,चक्कर येणे , सांधेदुखी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, दातांचे विकार दूर करण्यासाठी, पुरुषांमधला लैंगिक थकवा कमी करण्यासाठी व शुक्राणूंची वाढ करण्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. ही भाजी पचायला हलकी व पित्तनाशक आहे. त्वचाविकार व चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. या भाजीमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असून बिया औषधांमध्ये वापरल्या जातात.बियांचा उपयोग अतिसार ,नेत्ररोग ,रक्तदोष ,दृष्टिदोष ,मूत्ररोग यावर केला जातो . कुरडूच्या बियांची पावडर खडीसाखर व दुधासोबत घेतल्यास काम शक्ती वाढण्यास मदत होते. या वनस्पतीच्या बिया मुतखड्यावर खडीसाखरेसोबत घेतात. कफ असल्यास बिया ताकासोबत कुटून घेतल्यास फरक पडतो. पोट साफ होण्यासाठी ही भाजी दिवसातून एकदा अशी चार पाच दिवस खावी .पोट साफ होऊन जाते .
भाजी बनवण्याची पद्धत :
साहित्य :
दोन-चार जुडया कुरडूची पाने, एक टोमॅटो, दोन कांदे, लसुण , हळद, मीठ, तेल,जिरे ,मोहरी ,हिरवी मिरची.
कृती :
कुरडूची भाजी स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये थोडीशी उकडून घ्यावी. थंड झाल्यावर हाताने पिळून घ्यावी. भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा, लसुण जिरे,मोहरी, हिरवी मिरची , चिरलेला टोमॅटो यांची फोडणी देऊन तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यात पिळून ठेवलेली भाजी टाका. ती चांगली परतून घ्या. दहा ते पंधरा मिनिटांनी भाजी तयार होते .
तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.
हे पण वाचा : पावेटा /फापट रानभाजी
Post a Comment