टाकळा रानभाजी |Cassia Tora|टाकळा रानभाजी कशी बनवावी ?
टाकळा रानभाजी|Cassia Tora|टाकळा रानभाजी कशी बनवावी ?
टाकळा ही रोप वर्गीय वनस्पती असून ती ' सिसाल-पिनेसी ' म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे.या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅसिया टोरा (cassia tora) असे आहे. या वनस्पतीला काही भागांमध्ये 'तरोटा' किंवा 'तरवटा' अशा नावांनी देखील ओळखले जाते .ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि एक ते दोन फुटांपर्यंत वाढते. ही वनस्पती आपल्याला पडीक जमिनीवर ,माळरानावर ,रस्त्याच्या कडेला, जंगलात अशा सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळते. या वनस्पतीचे खोड गोलाकार असते तर फांद्या तळापासूनच तयार होतात. या वनस्पतीची पाने संयुक्त प्रकारची असून ती रात्री मिटतात. या वनस्पतीला फुले येण्याचा कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो . या वनस्पतीची फुले पानांच्या बेचक्यात जोडीने येतात व त्यांचा रंग पिवळा असतो . तसेच या वनस्पतीला साधारणपणे 10 सेमी ते 16 सेमी लांबीच्या शेंगा येतात . बिया कठीण कवचाच्या काळसर किंवा करड्या रंगाच्या आणि एका बाजूला कापल्यासारख्या असतात .
टाकळा या वनस्पतीमध्ये एमोडीन ग्लुकोसाइड आहे त्यामुळे ही वनस्पती सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर फायदेशीर आहे . त्वचा रोग झाला असल्यास पानांची भाजी देतात व बिया वाटून त्याचा लेप सुद्धा देतात. मुळे उगाळून त्यात लिंबाचा रस टाकून गजकर्णसाठी वापरतात . पानांचा काढा लहान मुलांच्या दात येण्याच्या वेळी येणाऱ्या तापवर दिला जातो . पित्त ,श्वास ,खोकला ,हृदयविकार यासाठी टाकळ्याच्या पानांचा रस मधातून दिला जातो .
टाकळ्याची भाजी रेसिपी :
टाकळ्याची भाजी गुणाने उष्ण असल्यामुळे मानवाच्या शरीरातील वात व कफ कमी करण्यास मदत करते. तसेच ही भाजी खाल्ल्यामुळे खरूज, अॅलर्जी, सोरायसिस, इसब असे त्वचा विकार कमी होण्यासही मदत होते. ह्या भाजीमुळे लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडतात. ही भाजी पचायला हलकी व मलसारक आहे.
साहित्य :
टाकळ्याची कोवळी पाने, हिरवी मिरची, कांदा ,तेल , लसूण ,मीठ, हळद, खोबरे, आले ,गुळ,भिजवलेली तूरडाळ किंवा मुगडाळ इत्यादी.
कृती :
प्रथम टाकळ्याची कोवळी पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर कढईत तेल टाकून कांदा तेलात परतून घ्यावा. नंतर त्यात लसूण हळद व हिरवी मिरची टाकून घ्यावी. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेली भाजी टाकावी व ती वाफेवर शिजू द्यावी. थोड्या वेळाने त्यात थोडा गूळ व मीठ टाकावे आणि नंतर त्यावर खोबरे घालावे. त्यानंतर तूरडाळ किंवा मुगडाळ टाकावी यामुळे भाजी आणखीनच चवदार बनण्यास मदत होते.
Post a Comment