शेवळा एक रानभाजी | How to make Shevala Bhaji |शेवळा |ड्रैगन स्टॉक याम रेसिपी |Dragon Stalk yam benefits
शेवळा एक रानभाजी| How to make Shevala Bhaji |शेवळा |ड्रैगन स्टॉक याम रेसिपी
मित्रांनो पहिला पाऊस पडला की, माती ओली होऊन जाते आणि चोहीकडे दरवळतो तो मातीचा सुगंध . या मातीच्या सुगंधाचा आपण सर्वांनीच अनुभव घेतला असेलच. पहिल्या पावसामुळे वातावरण सगळीकडे प्रसन्न होऊन जाते आणि मातीच्या ओलाव्यामुळे चाहूल लागते ती रानभाज्यांची. अशीच जमिनीतून अलगदपणे वर येणारी रानभाजी म्हणजेच शेवळा. शेवळा ही एक कंदवर्गीय भाजी आहे . ही भाजी खाजरी असल्यामुळे स्वच्छ करताना हाताला तेल लावून घ्यावे लागते. तर शेवळा रानभाजी कशी बनवली जाते (How to make Shevala Bhaji). तसेच Dragon Stalk yam benefits काय आहेत ते आता आपण बघू . तर भाजी बनवताना सोबत बोंडयाचा पाला किंवा काकड फळे तसेच कोकम आमसुले, चिंच यासारख्या आंबट असलेल्या पदार्थांचा वापर करून ती बनविली जाते .
शेवळा या भाजीला जंगली सुरण, अरण्य सुरण किंवा रान सुरण अशा विविध नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये ही भाजी कोकण, अकोला तसेच पश्चिम महाराष्ट्र इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. या भाजीचे शास्त्रीय नाव ॲमोरपोफॅलस कम्युटयॅटस असे आहे तर इंग्रजी नाव एलिफंट फुट याम आणि ड्रॅगन स्टॉक याम असे आहे.
1) शेवळा रानभाजीचे वर्णन :
या रानभाजी बद्दल सांगायचे झाल्यास या भाजीचे कंद जमिनीत चपटे व गोलाकार असतात. ही भाजी जमिनीपासून वर साधारणपणे आठ ते दहा इंच वाढत असते. काही ठिकाणी मात्र याच भाजीची प्रचंड आकारात वाढ झालेली पाहायला मिळते. काही ठिकाणी या भाजीचा देठ साधारणत: पाच ते सहा फुटांपर्यंत वाढलेला पाहायला मिळतो. मात्र या भाजीला काही भागामध्ये 'काहकाऱ्या' अशा नावाने ओळखले जाते. याचा पापुद्रा हा हिरव्या,पिवळ्या रंगाचा असतो. याच्या देठाची भाजी केली जाते व पापुद्रयाचा भाग वाळवून ठेवला जातो आणि नंतर हवी तेव्हा भाजी बनवली जाते.
शेवळा भाजीच्या वरच्या बाजूला एकावर एक असे पापुद्रे पाहायला मिळतात. या पापुद्रयांच्या आतमध्ये नाचणी सारखे बारीक दाणे असलेला भाग असतो. त्याच बरोबर पिवळसर करड्या रंगाचा भाग आणि हिरवट, काळे पांढरे ठिपके असतात. शेवळा ही रानभाजी रानावनात मोठमोठ्या झाडांच्याखाली, मोठ्या दगडांच्या शेजारी, लहान-मोठ्या झुडपाखाली उगवलेली पाहायला मिळते. ही रानभाजी ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बनली आहे. साधारणपणे जून-जुलै मध्ये ही भाजी बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. शहरांमध्ये या भाजीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
2) शेवळा भाजी रेसिपी :
साहित्य :
2 ते 3 जुड्या शेवळा भाजी,बोंडक्याचा पाला किंवा काकड फळे , 1 किंवा 2 कांदे, 1 चमच हळद, 1 किंवा 2 चमच तिखट, 1 चमच धना पावडर,लसूण ,जिरे ,मोहरी , तेल, चवीनुसार मीठ, आवश्यकता वाटल्यास खोवलेले खोबरे तसेच वाल सुद्धा वापरू शकता.
कृती :
शेवळा भाजी खाजरी असल्यामुळे प्रथम हाताला तेल लावून घ्या. भाजी स्वच्छ करताना भाजीच्या पापुद्राच्या आतमध्ये असलेला शेंदरी रंगाचा भाग काढून टाका. शेंदरी रंगाचा भाग काढून टाकल्यानंतर भाजी बारीक कापून घ्या. भाजी कापून झाल्यानंतर सोबत बोंडक्याचा पाला कापून घ्या किंवा काकड फळांचा रस काढून घ्या आणि कापलेल्या भाजीत टाका. त्यानंतर गरम पाण्यात भाजी शिजवून घ्या. आवश्यकता वाटल्यास त्यात आमसूल, चिंच इत्यादी आंबट पदार्थ टाका . नाही टाकले तरी चालतील. त्यानंतर भाजी 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्या. शिजवून घेतलेल्या भाजीत हळद, तिखट ,मीठ, धना पावडर इत्यादी पदार्थ टाका. त्यानंतर मिश्रण एकजीव करा. त्यानंतर पातेल्यात तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी, कांदा आणि लसूण टाकून ते मिश्रण लाल होऊन द्यावे. त्यानंतर त्यात एकजीव केलेले भाजीचे मिश्रण टाकावे आणि पळीने परतून घ्यावे. पुन्हा भाजी 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावी. 10 ते 15 मिनिटानंतर भाजी तयार होते.
3) शेवळा भाजी खाण्याचे फायदे :
शेवळा भाजी ही मुळात शेतात पिकवली जात नाही. ती रानावनात निसर्गाच्या सानिध्यात जमिनीतून वर येते. त्यामुळे या भाजीला मानव निर्मित कोणत्याही प्रकारचे केमिकलयुक्त खत मिळत नाही. त्यामुळे या भाजीला विविध प्रकारची खनिजे निसर्गातून आपोआपच मिळतात जे मानवाच्या शरीरासाठी उपयुक्त असतात. तसेच या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शेतीपद्धतीमुळे पिकांवर प्रचंड प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो. त्याचा घातक परिणाम मानवाच्या शरीरावर होतो. परंतु अशा निसर्ग निर्मित भाज्या खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या भाजीच्या कंदाची पाने दूध आणि साखरेसोबत वाजीकरणामध्ये दिली जातात. तसेच या भाजीमुळे पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते.
तर मित्रांनो आज आपण शेवळा या रानभाजी बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला नक्कीच भेट द्या.
हे पण वाचा : टाकळा रानभाजी
Post a Comment