पावेटा एक रान भाजी |पापट |फापट |Pavetta indica

 

पावेटा एक रानभाजी |पापट |फापट |Pavetta indica


Pavetta indica

पावेटा ही वनस्पती रुबियासी(Rubiaceae) कुळातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. ही वनस्पती उप उष्ण कटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय तसेच आशिया खंडात जंगलात गवताळ प्रदेशात झाडे झुडपांमध्ये आढळते. भारतामध्ये ही वनस्पती दक्षिण द्विकल्प कल्प आणि पश्चिम घाटात म्हणजेच सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळते. या वनस्पतीला हिंदीमध्ये कंकरा, कथाचंपा, मनिपुरी मध्ये कुकुरचुरा ,तमिळमध्ये करनई, मल्याळम मध्ये मल्लिका मुट्टी, तेलुगूमध्ये पापी, कन्नडमध्ये पावती, बंगालीमध्ये जुई , ओरिया, पान ,आसामीमध्ये साम-सुकु संस्कृतमध्ये काकचडी तर मराठीमध्ये या वनस्पतीला , पापट,पापडील अशा विविध नावांनी ओळखले जाते.ही एक रानभाजी असून ती महाराष्ट्रात काही भागात फापट ,आसवला ,नडगीची फुले अशा विविध नावांनी ओळखले जाते .

Pavetta indica

पावेटा (Pavetta indica ) ही रानभाजी आपल्याला पानझडी जंगल,डोंगर उतारावर सहज नजरेस पडते. कधीकधी ही वनस्पती आपण रस्त्यानेही प्रवास करताना तिच्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी आपले लक्ष पटकन वेधून घेते. या वनस्पतीची फुले पांढरीशुभ्र असून ती पुंजक्याने फांदीच्या टोकाला आलेली असतात. ही एक झुडुपवर्गीय वनस्पती असून साधारणपणे या वनस्पतीला एप्रिल-जून महिन्यात लहान पांढरी शुभ्र नळीच्या आकाराची फुले येतात.या फुलांची भाजी केली जाते . या फुलांमध्ये चार पसरलेल्या पाकळ्या दिसून येतात. या फुलांचा सुगंध साधारणपणे मोगऱ्याच्या फुलांसारखा असल्यामुळे ही वनस्पती पटकन लक्ष वेधून घेते. ही वनस्पती साधारणपणे चार ते पाच फुटांपर्यंत वाढते.वनस्पतीचे खोड एकल दांडयाच्या पद्धतीने वाढते तर विरुद्ध दिशेने काटकोनात फांद्या पसरलेल्या असतात . झाडाची साल हलकी राखाडी -तपकिरी तर पाने गडद हिरव्या रंगाची असतात . परंतु काही प्रदेशात फुले येण्याआधीच खोडावरची पाने गळून पडतात. ही वनस्पती दोन ते चार मीटर बाजूला पसरते. फुले गळून गेल्यावर त्यावर असंख्य वाटण्यासारखे ,मांसल अर्ध गोलाकार दाट गुच्छांमध्ये फळे तयार होतात. ही फळे बहुतेक वेळा झाडावर दीर्घकाळ टिकतात. या फळांमध्ये एक ते दोन कडक गोलाकार बिया असतात. ही फळे हिरव्या ते गडद काळ्या रंगापर्यंत परिपक्व होतात. बिया असलेली फळे आणि पांढऱ्या शुभ्र सुवासिक फुलांमुळे मधमाश्या ,माश्या , पतंग,मुंग्या ,फुलपाखरे, बहुसंख्य कीटक तसेच कीटक खाणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती या वनस्पतीकडे आकर्षित होतात.

Pavetta indica

उपयोग

या वनस्पतीमध्ये लिनोलिक ॲसिड ,फेर्सिलिक ॲसिड ,बीटा कॅरोटीन ,फेनोल्स ,फ्लेवनोइड्स , अल्कलोइड्स, क जीवनसत्व इत्यादी पोषक तत्वे आहेत . या वनस्पतीची पाने मूळव्याध आणि रक्तस्रावाच्या वेदनांसाठी वापरतात तर मुळांच्या सालीमध्ये डी-मॅनिटॉल असते.

टीप : ही भाजी बनवताना तुम्ही सुकट किंवा मोड आलेले वाल असे पदार्थ वापरू शकता आणि जर हे पदार्थ वापरायचे नसतील तर केवळ फुलांचीच भाजी तुम्ही बनवू शकता.

भाजी बनवण्याची पद्धत

साहित्य :
पावेटा भाजीची फुले, एक कांदा , दोन चमच मिरची पावडर, एक चमच हळद ,एक चमच धना पावडर ,तेल, मीठ इत्यादी

कृती :
प्रथम फुले गुच्छातून तोडून घ्या. तोडलेली फुले दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर उकळून घेतलेली फुले थंड करून दोन्ही हातानी व्यवस्थित पिळून घ्या. प्रथम तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमच मिरची पावडर, एक चमच हळद ,एक चमच धना पावडर टाका. नंतर त्यात उकळून पिळून घेतलेली भाजी टाका. नंतर गॅस मंद करून पातेल्यावर झाकण ठेवून त्यामध्ये थोडं पाणी टाका. थोड्या वेळाने झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ टाका आणि झाकण पुन्हा ठेवा. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे भाजी व्यवस्थित शिजवून घ्या.

हे पण वाचा : शेवळा एक रानभाजी









No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.