कुड्याच्या शेंगांची भाजी | कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ?
कुड्याच्या शेंगांची भाजी | कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ?
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जीवनशैली ही निसर्गाशी अतूट नातं निर्माण करणारी आहे . कोकण ,घाटमाथा ,मराठवाडा ,विदर्भ इत्यादी भागात विविध ऋतुंनुसार मिळणाऱ्या रानभाज्या हा आपल्या पारंपरिक आहाराचा एक अमूल्य असा भाग आहे .उन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानभाज्यांची खास चव जागी होण्याचा काळ . रानभाज्या सुरू होण्याचा काळ, तसेच ग्रामीण भागातील लोकांना या कालावधीत थोडाफार आर्थिक हातभार लागण्यासही मदत मिळते . डोंगरावर , माळरानावर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या कुड्याच्या शेंगांना बाजारात पाहिलं की , लहानपणाची आठवण आपसूकच जागी होते . आईने किंवा आजीने बनवलेली कुड्याच्या शेंगांची भाजी म्हणजे केवळ भूक भागवण्याचे साधन नाही तर ती एक आठवण आहे .ही भाजी खाल्ली की, नकळत गावाकडच्या मातीत पोहोचल्यासारखे वाटते आणि गावाकडच्या आठवणी जाग्या होतात .फायबरयुक्त ,पचनासाठी उत्तम आणि संपूर्णत: नैसर्गिक आहे .तसेच आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उपयुक्त मानली जाते .
आजही आजीच्या हातची कुड्याची शेंगांची भाजी आठवते ? तीच चव पुन्हा घरी आणा . चला तर मग ,आज आपण कुड्याच्या शेंगांची पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी अगदी घरच्या घरी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत .
कुड्याची शेंग म्हणजे काय ?
कुडा ही एक रानभाजी आहे . कुड्याची शेंग म्हणजे कुडा वनस्पतीला येणाऱ्या शेंगा .या शेंगा सहसा जून-ऑगस्ट महिन्यात कुडा वनस्पतीला लागतात . ही वनस्पती आपल्याला झुडुपाच्या स्वरूपात किंवा लहान वृक्षाच्या स्वरूपात आढळते . ही वनस्पती सहसा माळरानावर , विरळ जंगल आणि डोंगर उतारावर आढळते. याला उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाची फुले गुच्छांमध्ये येतात. या फुलांची सुद्धा भाजी बनवतात . तर शेंगा या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात . या हिरव्या रंगाच्या साधारणपणे 15-20 सेमी लांबीच्या बारीक आणि टोकदार असतात .शेंगा या जोडीने येतात . काही शेंगांवर बारीक पांढरे ठिपके असतात ,जे हाताचा स्पर्श केला असता खरबरीत असे जाणवतात . तर काही शेंगांवर तपकिरी करड्या रंगाचे पट्टे असतात . शेंगांची चव कडू असते . या शेंगा ग्रामीण भागातील महिला गोळा करून बाजारात विकायला आणलेल्या आपण पाहातो .
कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ?
साहित्य :
कुड्याच्या शेंगा- 250 ग्रॅम
कांदा -1 (बारीक चिरलेला )
लसूण - 5-6 पाकळ्या
हळद - 1/4 टी स्पून
तिखट - 1 टी स्पून
तेल - 2 टेबल स्पून
मोहरी - 1/2 टी स्पून
जिरे - 1/2 टी स्पून
मीठ - चवीनुसार
कृती :
पायरी 1 : तयारी
प्रथम कुड्याच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवा . त्यानंतर हाताला तेल लावा . कारण शेंगांना चीक असतो . नंतर शेंगा बारीक चिरून घ्या . चिरून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्यात धूऊन घ्या ,म्हणजे चीक निघून जाईल . चिरलेल्या शेंगा धूऊन झाल्यानंतर गरम पाण्यात वाफवून घ्या किंवा कुकरला 2-3 शिट्ट्या द्या . वाफवून घेतल्यानंतर त्यातील चीक मिश्रित पाणी काढून टाका .वाफवलेल्या शेंगा थोडावेळ थंड होऊ द्या . नंतर भाजी हाताने पिळून घ्या म्हणजे त्यातील कडवटपणा निघून जाईल . पिळून घेतल्यानंतर भाजी हाताने कुस्करून घ्या .
पायरी 2 : फोडणी तयार करा.
कढईत तेल टाकून गरम करून घ्या . तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी व जिरे टाका . तडतड आवाज आल्यानंतर त्यात ठेचलेली लसूण टाका . लसूण थोडा खरपूस झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून तो लालसर होईपर्यंत परता .
पायरी 3 : मसाला घाला.
कांद्यामध्ये तिखट आणि हळद घालून थोडं परतून घ्या. परतून झाल्यानंतर त्यात कुस्करून घेतलेली कुड्याची भाजी टाका आणि मिश्रण एकजीव करा .
पायरी 4 : भाजी शिजवा.
मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवा . त्यात पाणी ठेवून भाजी मध्यम आचेवर 10-15 मिनिटे शिजवा .
पायरी 5 : शेवट
झाकण काढून त्यात मीठ टाकून पुन्हा ढवळून घ्या .झाकणातील पाणी टाकून द्या . ते पाणी भाजीत टाकू नका . आता झाकण पुन्हा ठेवून भाजी वाफेने शिजू द्या . असं केल्याने भाजीचा स्वाद दुप्पट होतो .
कुड्याच्या शेंगांची भाजी कशा सोबत खाल ?
जेवणात गरम भात , चपाती किंवा भाकरी असली तर ही भाजी त्यासोबत झणझणीत आणि स्वादिष्ट लागते .
आरोग्यदायी फायदे
पचनक्रिया सुधारते.
रासायनिक खतांशिवाय निसर्गात उपलब्ध असलेली आणि शरीरास पोषक.
आजीच्या आठवणींना उजाळा देणारी भाजी
आजही कोकणामध्ये घरोघरी कुड्याच्या शेंगांची भाजी बनवली जाते . लहानपणी आजीच्या मागे मागे जंगलात फिरून आणलेल्या कुड्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याची आठवण तुम्हालाही येतेय का ? कुड्याच्या शेंगांची भाजी ही फक्त एक पाककृती नाही ,तर ती गावच्या आठवणींशी जोडलेली एक नाळ आहे .
महत्वाच्या टिप्स :
जर शेंगा कोवळ्या असतील, तरच कुड्याच्या भाजीचा खरा स्वाद अनुभवता येतो .
भाजीला अधिक खमंग वास आणि चव येण्यासाठी लसूण थोडा जास्त वापरा .
भाजी मोकळी हवी असेल, तर पाणी अजिबात घालू नका .
FAQ :
1) कुड्याच्या शेंगांचा स्वाद कसा असतो ?
उत्तर - कुड्याच्या शेंगांचा स्वाद कडू व तुरट असतो .
2 ) कुड्याच्या शेंगांची भाजी शाकाहारी की अर्ध शाकाहारी लोक खातात ?
उत्तर - ही पूर्णपणे शाकाहारी भाजी आहे .
3 ) कुड्याच्या शेंगांची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ?
उत्तर -होय , कुड्याच्या शेंगांमध्ये फायबर ,औषधी गुणधर्म आणि पचनास मदत करणारे घटक असतात . ह्या शेंगा शरीरासाठी उपयुक्त मानल्या जातात .
निष्कर्ष :
कुड्याच्या शेंगांची भाजी ही फक्त एक पारंपरिक पदार्थ नाही , तर ती ग्रामीण संस्कृतीची ओळख आणि आठवणींचा ठेवा आहे . शेंगा बाजारात मिळाल्या तर लगेच घ्या आणि पारंपरिक पद्धतीने भाजी करून बघा - एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल . जर ही चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा . तसेच तुमच्याकडे कुड्याच्या शेंगांच्या भाजीची वेगळी पद्धत आहे का ? असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा .
हे ही वाचा : करवंदांची आंबील कशी बनवावी ?
कोकणातील तरुणांसाठी उत्तम व्यवसाय संधी -कमी गुंतवणूक करा ,जास्त नफा मिळवा
Post a Comment