कुड्याच्या फुलांची भाजी कशी बनवावी ? - एक स्वादिष्ट आणि पारंपरिक पाककृती

 

कुड्याच्या फुलांची भाजी कशी बनवावी ? - एक स्वादिष्ट आणि पारंपरिक पाककृती


भारतीय स्वयंपाक घरात विविध प्रकारच्या पारंपारिक भाज्यांना महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. ग्रामीण भागामध्ये विशेषत: पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काही विशिष्ट प्रकारचा भाजीपाला आपल्याला सहज उपलब्ध होतो. ग्रामीण भागातून उपलब्ध झालेला भाजीपाला आरोग्यदायी आणि चवीलाही खास असतो. अशाच एका रानभाजीची माहिती आज आपण जाणून घेऊया . ती भाजी आहे- कुड्याची फुले. कुड्याची फुले ही पांढऱ्या रंगाची असून ती ग्रामीण भागामध्ये सहज उपलब्ध होतात आणि त्यांची भाजीही अत्यंत स्वादिष्ट लागते. "कुड्याच्या फुलांची भाजी" ही एक पारंपरिक रानभाजी असून ती , कमी वेळात सहज सोप्या पद्धतीने तयार करता येते. ही भाजी पोषणमूल्याने भरलेली असते. चला तर आज आपण या रानभाजी बद्दल जाणून घेऊया.
कुड्याची फुले


कुडा म्हणजे काय ?

कुडा ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून ती वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. जसे संस्कृतमध्ये कुटज ,इंद्रजव हिंदीमध्ये कुरैया ,कूडा इंग्रजीमध्ये कुर्ची बंगालीमध्ये कुरची लॅटिनमध्ये होलेरिना अॅंटीडीसेन्ट्रिका गुजरातीमध्ये कडों तर मराठीमध्ये कुडा या नावाने ही वनस्पती ओळखली जाते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Holarrhena pubescence wall असे आहे . तसेच ही वनस्पती करवीर कुळातील (Apocynaceae) आहे. 12 ते 15 फुटापर्यंत उंच वाढणाऱ्या या वनस्पतीच्या प्रत्येक फांदीच्या टोकाला पांढऱ्या रंगांच्या फुलांचे गुच्छ येतात. साधारणपणे फेब्रुवारी ते जून या महिन्यांमध्ये या वनस्पतीच्या फांद्यांवर फुले येतात. फुलामध्ये पाच पाकळ्या असतात.फुलांना मंद सुवास असतो . फुलांची भाजी विविध प्रकारे बनवली जाते. पाने साधी आणि समोरासमोर , तळाशी रुंद असलेली पुढे टोकदार असतात. या वनस्पतीला शेंगा लांबट आकाराच्या आणि जोडीने येतात. त्यावर पांढरे ठिपके असतात. या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते. ही भाजी अत्यंत चविष्ट असते. शेंगामधील बिया जवासारख्या लहान , चपट्या व केसाळअसतात . या बियांना इंद्रजव असे म्हणतात. बियांची चव कडवट व जरा तुरट असते. या वनस्पतीमध्ये पांढरा कुडा, तांबडा कुडा आणि काळा कुडा असे तीन प्रकार आढळतात .साल करड्या रंगाचीअसते तर मुळे वेडीवाकडी ,खडबडीत आणि उदी रंगाची असतात.सालीपासून कुटजारिष्ट हे औषध बनविले जाते .

कुडा ही वनस्पती कोठे आढळते ?

पानझडी असलेली ही वनस्पती ऑस्ट्रेलिया, म्यानमार व श्रीलंका या देशांमध्ये तर भारतात हिमालयात, महाराष्ट्रात पानझडी वनांमध्ये सामान्यपणे आणि कोकणात तर मोठ्या प्रमाणावर आढळते.
कुड्याची फुले


कुडा वनस्पतीचे औषधी उपयोग

या वनस्पतीचा उपयोग रक्तस्राव ,अतिसार ,मूळव्याध ,आमांश इत्यादी विकारांवरील आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो . कुड्याची साल त्वचा विकारावर गुणकारी आहे . या वनस्पतीच्या बिया कृमिनाशक व वायुनाशी असून अतिसार ,शूळ, जीर्णज्वर यावरही उपयुक्त आहेत.

फुलांची भाजी कशी बनवावी ?

फुले निवडताना ताजी फुले घ्यावीत. खूप जुनी व सुकलेली फुले घेऊ नयेत. तसेच फुले स्वच्छ धुवून घ्यावीत.

साहित्य :
1 ) साफ केलेली कुड्याची फुले
2 )कांदा - 1 मध्यम आकाराचा चिरलेला
3 ) लसूण - 4-5 पाकळ्या
4 ) मोहरी - 1/2 चमच
5 ) जिरे - 1/2 चमच
6) हळद - 1/4 चमच
7 ) तिखट - 1 चमच (चवीनुसार )
8 ) मीठ : चवीनुसार
9 ) तेल - 2 चमच (गरजेनुसार )
10 ) कोथिंबीर - सजावटीसाठी

कृती :

1 ) तयारी :

कुड्याची फुले नीट स्वच्छ धुऊन घ्यावीत . धुतलेली फुले गरम पाण्यात 5 मिनिटे वाफवून घ्यावीत . वाफवून घेतलेली फुले थोडावेळ थंड होऊ द्यावीत . थंड झालेली फुले हाताने पिळून घ्यावीत . लसूण थोडीशी ठेचून घाला म्हणजे त्याचा स्वाद भाजीत छान उतरतो .

2 ) फोडणी :

एका कढईत तेल गरम करून घ्या . त्यात मोहरी घाला . मोहरी तडतडली की त्यात जिरे घाला . त्यानंतर ठेचलेला लसूण घालून एक मिनिट परतवा . मग त्यात कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परतवा .

3 ) मसाले :

कांदा शिजल्यानंतर त्यात हळद ,तिखट व मीठ घालून 2-3 मिनिटे परतवावे .

4 ) कुड्याची फुले घालणे :

कांदा ,हळद ,तिखट व मीठ परतवून झाल्यानंतर पिळून ठेवलेली कुड्याची फुले घालावीत . नीट ढवळून घ्यावे आणि 5 - 7 मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजू द्यावी . कधी कधी कुड्याच्या फुलांतून पाणी सुटते ,त्यामुळे फारसं वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही . पण गरज पडल्यास 2 -3 टेबलस्पून पाणी शिंपडावे .

5 ) अंतिम टप्पा :

भाजी चांगली शिजली की वरुन कोथिंबीर घाला . गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवून भाजीला 'सेट' होऊ द्या .
कुड्याची फुले


भाजी कशाबरोबर खावी ?

गरम गरम फुलके , चपाती किंवा भाकरीसोबत कुड्याच्या फुलांची भाजी खूपच छान लागते . त्यासोबत घरगुती ताक किंवा एखादं लोणचं असेल ,तर जेवण परिपूर्ण वाटतं.

कुड्याच्या फुलांच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे

पचन सुधारते - कुड्याची फुले थोडी कडसर असल्याने ती पाचक असतात .
कमी तेलात बनवली तरी चवदार लागते - त्यामुळे आहारात हा एक हेल्दी पर्याय आहे .
हिवताप ,सर्दी ,अपचन यावर उपयोगी - पारंपरिक औषधी गुणधर्म .

थोडे टिप्स :

फुले खूप मोठी किंवा जुनी असतील ,तर शिजायला वेळ लागू शकतो . काहीजण हिरवी मिरची वापरतात . त्यामुळे लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे प्रमाण चवीनुसार ठरवा - ही भाजी लसूण - मिरच्यांनीच उठून दिसते . काहीजण यामध्ये ओल्या खोबऱ्याचे पातळ वाटणसुद्धा घालतात .

शेवटी .......

कुड्याच्या फुलांची भाजी ही ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारी आणि पारंपरिक भाजी असून ,अलीकडच्या काळात ही भाजी शहरी भागातही हळूहळू लोकप्रिय होत आहे . ही भाजी एकदा बनवून खाल्ली की , तिचा खास स्वाद पुन्हा पुन्हा आठवत राहतो . स्वयंपाकघरात नवनवीन आणि स्थानिक भाज्यांचा समावेश करणं,हे आपल्याला केवळ चवीनं नव्हे ,तर आरोग्यानंही समृद्ध करतं.
जर तुम्ही अजूनपर्यन्त कधी कुड्याच्या फुलांची भाजी खाल्ली नसेल ,तर एकदा ही भाजी नक्की करून पाहा - एक वेगळी आणि खास चव येते . अशी ही पाककृती तुमच्या जेवणात नक्कीच रंग भरेल !
हे सुद्धा वाचा . काटेसावर भाजी

फापटची भाजी


No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.