मालवण जवळील 10 पर्यटन स्थळे| Top 10 Tourist Places Near Malvan|Malvan
मालवण जवळील 10 पर्यटन स्थळे| Top 10 Tourist Places Near Malvan|Malvan
कोकण म्हटले की निसर्ग सौन्दर्य आलेच . येथे येणारे पर्यटक निसर्गाचा भरभरून आनंद लुटत असतात . अथांग पसरलेल्या सागरी किनाऱ्यावर फिरताना पर्यटक आपला ताणतणाव विसरून मंत्रमुग्ध होऊन जातात . मग मालवण हा सुद्धा एक कोकणातील असाच स्पॉट आहे जो पर्यटकांना आकर्षित करीत असतो . काय आहे असं इथे की, पर्यटकांना या पर्यटन स्थळाची भुरळ पडते. मालवण हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी येथेच अरबी समुद्रात असणाऱ्या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तसेच मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत तालुका समजला जातो. तर या तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमुळेच हा तालुका सधन आणि प्रसिद्ध बनला आहे. तर ती प्रसिद्ध 10 पर्यटन स्थळे जाणून घेऊया.
1 ) तारकर्ली बीच
अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि कर्ली नदी यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य म्हणजे तारकर्ली बीच.हा पर्यटकांचा कोकणातील आवडता पिकनिक स्पॉट आहे . हा बीच म्हणजे एक छुपे रत्न म्हणायला काही हरकत नाही . बीचवरील पायांना स्पर्श करणारी मऊ वाळू ,कोवळे ऊन जणू काही स्वर्गच. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा ,सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. तीरावरील नारळी पोफळीची हिरवीगार झाडी, सूर्योदय व सूर्यास्त या दोन्हींचे अनोखे दिव्य सौंदर्य न्याहाळण्यासाठी हे अप्रतिम असे ठिकाण आहे. शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य शोधत असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे . कोकणात वसलेल्या या बीचला स्वच्छ निळे पाणी , समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे .गर्दीपासून दूर, शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बोट सफरी ,स्कुबा डायव्हिंग तसेच इतर वॉटर स्पोर्ट्सचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. हे ठिकाण मालवण पासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर आहे.
2) चिवला बीच
समुद्राच्या पाण्यावर मावळणारा सूर्य आणि त्याची सोनेरी किरणे यांचा रोमान्स अनुभवायचा असेल तर या बीचला आवश्य भेट द्या. हा बीच म्हणजे सर्वात सुंदर मालवणच्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.येथील पांढरीशुभ्र अतिबारीक आणि चकचकीत वाळू पर्यटकांचे लक्ष वेधून घेते . आसपास दुकानांची गर्दी नसल्यामुळे शांत आणि स्वच्छ असलेला हा बीच शांत ठिकाणे शोधणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम असे ठिकाण आहे . हा बीच सुमारे 1.5 किमी लांबीचा असून पर्यटक या बीचवर संध्याकाळी फेरफटका मारणे पसंत करतात. येथे तुम्हाला पारंपारिक पद्धतीने मासेमारी कशी केली जाते याचाही अनुभव घेता येतो.या बीचपासून अगदी जवळच 'रॉक गार्डन' हे ठिकाण आहे . हे ठिकाण मालवण पासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे.
3 ) मालवण बीच
हे एक कोकणातील सुंदर असे पर्यटन स्थळ आहे . दरवर्षी भारतातील विविध ठिकाणांवरून पर्यटक येथे येत असतात . येथे लोकांची जास्त गर्दी नसल्यामुळे हा बीच् शांततापूर्ण व मनाला आनंद देणारा आहे . या बीचवरच्या नारळी पोफळीच्या बागा, सुपारीची झाडे ,मऊ पांढरीशुभ्र वाळू आणि अथांग पसरलेल्या समुद्राचे सौंदर्य निश्चित तुमच्या मनाला भुरळ घालून जाते. मऊ वाळूत पावले टाकताना मनाला खूप आनंद व प्रसन्नता मिळते.महाराष्ट्रातील हा एकमेव समुद्र किनारा आहे जो रात्रीच्या अंधारात चमकतो . त्यामुळे येथील किनाऱ्यावर हा अद्भूत नजारा पाहायला मिळतो . पर्यटक येथे सुंदर निळ्या - हिरव्या रंगाचा चमकणारा समुद्र पाहण्यासाठी रात्री बोटीतून सफर करतात .
4) सिंधुदुर्ग किल्ला
हा मालवण जवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. हा जलदुर्ग कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेला आहे . त्याची तटबंदीची लांबी साधारणपणे तीन किलोमीटर आहे. किल्ल्यावर शिवकालीन तीन गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी पाहायला मिळतात. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे मंदिर आहे . याची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. किल्ल्यावर जाण्यासाठी किनाऱ्यावरून बोटींची सोय आहे . हा किल्ला मालवण पासून समुद्रात साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे.
5 ) देवबाग बीच
देवबाग बीच आणि तारकर्ली बीच हे दोन्हीही बीच एकमेकांना लागूनच आहेत . देवबाग बीच सुंदर आणि नयनरम्य असा बीच आहे. इथली पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ निळ्या पाण्याचा बीच नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आला आहे . येथे तुम्हाला समुद्री पक्ष्यांचा थवा बघण्याचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर नदी आणि समुद्राच्या पाण्याचा संगम देखील पाहायला मिळतो . बीचवर तुम्ही वॉटर स्कूटर, जेट स्केईंग ,बंपर राईड ,डॉल्फिन बोट राईड, स्काय बोटिंग ,पॅरासेलिंग अशा अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्टचा आनंदही घेऊ शकता . हे ठिकाण मालवण पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे.
6) रॉक गार्डन
मालवण जवळील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये रॉक गार्डनचा देखील समावेश आहे. मालवणमधील हे एक आकर्षक असे ठिकाण आहे . समुद्रकिनाऱ्याला लागून खडकाळ भागात हिरवळ आणि विविध फुलझाडांनी बहरलेली सुंदर अशी ही बाग आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटक येथे गर्दी करत असतात. येथे तुम्ही एल. ई. डी. लाइट, छोटे तलाव, लहान मुलांसाठी खेळणी या सर्वांचा आनंद घेऊ शकता .हे ठिकाण मालवण पासून साधारणत: 2.5 किलोमीटर अंतरावर आहे.
7 ) त्सुनामी आयलँड
तारकर्ली नदीच्या संगमाच्या टोकाकडे वसलेले त्सुनामी बेट हे सुंदर आणि मनमोहक आहे. हे ठिकाण येथे होणाऱ्या साहसी उपक्रमांमुळे नेहमीच पर्यटकांनी खच्चून भरलेले असते. त्सुनामी प्रलयामुळे हे बेट तयार झाले तेव्हापासून ते खूप प्रसिद्ध झाले आहे . येथे जाण्याकरिता नदी समुद्राच्या संगमाच्या ठिकाणावरून बोटीने जावे लागते . या आकर्षक बेटावर फिरायला विसरू नका, कारण स्थानिक लोक म्हणतात की ही चुंबकीय वाळू आहे जी सांधे मालिश करण्यासाठी वापरली जाऊ शकते. येथे तुम्ही पाण्यात बसून कोल्ड्रिंक्स व स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण मालवण पासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर आहे.
8 ) जय गणेश मंदिर
मालवणमधील जय गणेश मंदिर हे सुद्धा पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे. या मंदिराच्या वास्तुकलेचे वैशिष्ट्ये म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटेची सूर्यकिरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिरातील मूर्ती ही भगवान गणेशाची असून दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीसह पारंपारिक मुद्रांमध्ये पाहायला मिळते. मालवण बीचवरून हे मंदिर जवळच आहे.
9 ) बोट सफारी
जर तुम्हाला बोट सफारी करायची असेल तर देवबाग संगमावर जावे लागेल. इथून तुम्हाला सफारी बोटी मिळून जातात. बोट सफारीमध्ये तुम्हाला गोल्डन रॉक, डॉल्फिन पॉईंट, भोगवे बीच ,निवती बीच अशा सुंदर ठिकाणांची सफारी अनुभवायला मिळते, येथे तुम्हाला कोकणात आल्याचा अविस्मरणीय अविष्कार अनुभवायला मिळतो .
10 ) स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स
मालवणमध्ये आल्यानंतर स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सची मजा काही औरच असते. तारकर्ली बीच आणि मालवण बीच येथे तुम्ही पॅरासेलिंग ,बनाना बोट राईड, जेट स्किईंग , बंपर बोट राईड तसेच स्कुबा डायव्हिंग स्पोर्टचा आनंद घेऊ शकता. त्सुनामी बेट येथे स्कुबा डायव्हिंग व्यतिरिक्त इतर वॉटर स्पोर्टचा आनंद तुम्ही घेऊ शकता. खवय्यांसाठी येथील सी फूड सुद्धा लोकप्रिय आहे.
त्याचबरोबर येथे खवय्यांसाठी विविध प्रकारचे मालवणी खाद्यपदार्थ ,सी फूड व मालवणी मसाले उपलब्ध असतात. तसेच येथे आंबा ,काजू ,नारळ ,कलिंगड ,सुपारी तांदूळ ,रातांबे अशी उत्पादने सुद्धा मोठ्याप्रमाणावर उत्पादित होतात.तुम्ही सुद्धा या ठिकाणाला एकदा तरी भेट द्या आणि येथील सी फूडचा आस्वाद व इतर आनंद नक्की घ्या .
हे ही वाचा : कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे
Post a Comment