पाली- सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे| Ancient Places in Pali Sudhagad Talukas
पाली- सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे|Ancient Places in Pali- Sudhagad Talukas
भारतातील महाराष्ट्र राज्यातील सुधागड तालुका हा रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी एक तालुका आहे. हा तालुका ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा मुलगा अकबर याची भेट सुद्धा याच तालुक्यात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी इतिहास प्रेमींना व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आली आहे. या तालुक्यात अनेक प्राचीन स्थळे आहेत. त्या स्थळांबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.
1) सुधागड
सुधागड हा सुधागड तालुक्यातील एक प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्याला भोरपगड असेही म्हणत . पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला हा किल्ला सुधागड या नावाने ओळखला जाऊ लागला . या किल्ल्यावर जाण्यासाठी धोंडसे गाव मार्गे आणि पाच्छापूर गाव मार्गे असे दोन मार्ग आहेत. त्यांपैकी पाच्छापूर गाव मार्गे गेलात तर दर्यागाव ठाकुरवाडी या गावापासूनच सुधागड किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. साधारणपणे 20 - 25 मिनिटे प्रवास केल्यानंतर एक लोखंडी जिना दिसतो. हा लोखंडी जिना म्हणजे तुम्ही अचूक मार्गाने गड्यावर जात आहात याचे संकेत देतो. पुन्हा एक लोखंडी जिना चढून साधारणपणे तासाभराच्या चढाईनंतर तुम्ही एका उद्ध्वस्त झालेल्या दरवाजाजवळ येऊन पोहोचता. दरवाजा चढून गेल्यानंतर उजव्या हाताला चिलखती बुरुज आणि चोरवाट पहायला मिळते. येथे विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा चढाई करताना डाव्या बाजूला पाण्याचे टाके पाहायला मिळते. हा ट्रेक जर तुम्ही ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात करत असाल तर पिवळ्या रंगाच्या सोनकीच्या फुलांनी नाहून गेलेला गड डोळ्यांचे अगदी पारणे फेडतो. किल्ल्याच्या शिखरावर विस्तीर्ण असा पठार आहे. राजधानीसाठी याही किल्ल्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता असे सांगितले जाते. याच गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावात छत्रपती संभाजीराजे व अकबर यांची भेट झाली होती.किल्ल्यावर गेल्यावर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आजूबाजूची निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना थक्क करून सोडतात . गड चढून वर गेल्यावर डावीकडे कमळ तळे आणि महादेव मंदिर पाहायला मिळते. थोडे अंतर चालल्यानंतर उजव्या बाजूला पाण्याचे टाके तर समोर गेल्यावर पंत सचिवांचा वाडा पाहायला मिळतो. वाड्यातून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे श्री शंकराचे मंदिर तर थोडे पुढे जाऊन डावीकडे चोर वाटेकडे जाणारा मार्ग पाहायला मिळतो. सरळ समोरच पायऱ्या चढून गेल्यास भोराई देवीचे मंदिर दिसते. मंदिरामध्ये तुम्हाला पोर्तुगीज शैलीची घंटा आणि बाहेर पडल्यानंतर दीपमाळ आणि समोरच समाध्या पाहायला मिळतात. मंदिराच्या उजवीकडची वाट ही दारू कोठाराचे अवशेष आणि टकमक टोकाकडे जाते. मंदिरापासून एक वाट दिंडी दरवाजाकडे जाते ज्याला महादरवाजा असे म्हटले जाते. हा दरवाजा रायगड किल्ल्यावरील महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती आहे. किल्ल्यावर अजून तुम्हाला श्री सिद्धेश्वर मंदिर ,गजलक्ष्मी मंदिर ,हनुमान तलाव, धान्य कोठार, पाण्याचे टाके, घोडे पागा, हत्ती पागा अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात. सुधागड किल्ला म्हणजे इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी आणि साहसी प्रेमींसाठी एक खजिना आहे. हा किल्ला पाली शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.
2 ) श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली
श्री बल्लाळेश्वर मंदिर हे गणपतींच्या आठ मंदिरांपैकी एक असून भक्तांचे अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे. 'बल्लाळेश्वर' या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे एकमेव मंदिर आहे.हे मंदिर जागृत आणि स्वयंभू मंदिर म्हणून ओळखले जाते . या मंदिरात जाण्याआधी धुंडीविनायक मंदिरात जाण्याची प्रथा आहे . मंदिरातील मूर्ती ही पूर्वाभिमुख असून ध्यान स्थितीत आहे आणि तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यात सूर्याचे किरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिरामध्ये एक मोठी घंटा असून समोर दोन तलाव पाहायला मिळतात. या मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. मंदिराचे बांधकाम दगडी शैलीचे असून अतिशय रेखीव असे आहे. गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंती या सणांच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. माघी गणेश जयंतीला येथे मोठा उत्सव भरतो. येथे भेट देणाऱ्या भक्तांसाठी प्रासादाची व राहण्याची सोय उपलब्ध आहे. हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 115 किमी तर पुण्यापासून सुमारे 121 किमी अंतरावर आहे .
3 ) सरसगड
पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराजवळ असलेला हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला पावसाळ्यात अतिशय विलोभनीय दिसतो. तुलनेने छोटा पण सुंदर असा किल्ला. हा किल्ला म्हणजे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक आकर्षण यांचे मनमोहक मिश्रण आहे असे म्हणायला काही हरकत नाही. किल्ल्याच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे . या किल्ल्यावरून अप्रतिम असे दृश्य पाहावयास मिळते. तसेच येथे पाण्याची अनेक टाकी , किल्ल्याची प्राचीन रचना आणि दगडी पायऱ्या किल्ल्याचा समृद्ध इतिहास दर्शवितात. निसर्ग, इतिहास आणि शांतता शोधणाऱ्या साहस प्रेमींसाठी हा एक परिपूर्ण विकेंड म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही उत्साही ट्रेकर आणि इतिहासप्रेमी असाल तर तुमच्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. जर तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य पाहायचे असेल तर किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन त्याचा अनुभव घेता येतो.माथ्यावरून तीन कावडीचा डोंगर ,सुधागड, तैल बैला, घनगड आणि कोरीगडही दिसतो .
4) खडसांबळे किंवा नेणवली लेणी
सुधागड तालुक्यात असलेली ही लेणी पाहाण्यासाठी तीन मार्गांनी जाता येते . एक म्हणजे नेणवली गावातून जाणारा मार्ग हा सर्वांत सोपा मार्ग आहे .नेणवली गावातून या लेण्यात सहज पोहचता येते म्हणून या लेण्यांना नेणवली लेणी असेही म्हणतात . दूसरा मार्ग म्हणजे खंडसांबळे गावातून जाणारा मार्ग . या वाटेने लेण्यांपर्यन्त पोहचण्यासाठी सुमारे एक तास लागतो आणि तिसरा मार्ग म्हणजे केवणी पठार मार्ग . हा अतिशय अवघड असा मार्ग आहे . पण पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे . केवणी पठार येथून लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागतो . खंडसांबळे किंवा नेणवली हा एक 37 बौद्ध लेण्यांचा समूह असून इ. स . पू . पहिल्या शतकात कोरल्याचे समजते . हा ट्रेक करताना पक्षी ,वारा , कीटक यांचा आनंदही घेता येतो . सभोवताली निरव शांतता असल्यामुळे द्यानासाठी खूप छान अशी ही जागा आहे . या लेण्यांविषयी जास्त माहिती सापडत नाही, परंतु येथील स्तूपाची रचना पाहता अशा पद्धतीचा स्तूप आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. शिल्पकलेने समृद्ध असलेला स्तूप हे एक या ठिकाणचे खास वैशिष्ट्ये पाहायला मिळते. या लेण्यांच्या अनेक गुहा गाडल्या गेल्या असल्याने त्यांचे सर्व प्रवेशद्वार नष्ट झालेले आहेत. या लेण्यांचा खडक लालसर, तपकिरी दगडाचा आणि तो फार टिकाऊ नसल्यामुळे या लेण्यांचे गंभीर नुकसान झालेले पाहायला मिळते .ही लेणी पालीपासून सुमारे 35 किमी अंतरावर आहेत .
5 ) गोमाशी लेणी
ही लेणी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेली आहेत . आजूबाजूला असलेला जंगल परिसर यांच्यामुळे या लेण्यांची सफर अत्यंत आल्हाददायक होते . गोमाशी गावापासून ही लेणी साधारण 1 किमी अंतरावर आहेत . ही लेणी एकांतात ,जंगलात आणि डोंगराच्या खोबणीत कोरलेली पाहावयास मिळतात . लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत . पायऱ्या चढून वर गेल्यावर गुहेत समोर पद्मासनात ध्यानस्थ अवस्थेत विराजमान असलेल्या गौत्तम बुद्धांचे सुबक -सुरेख कोरीव शिल्प पाहावयास मिळते . या लेण्यांचा प्रथम शोध जे . इ . ॲबॉट यांनी सन 1889 मध्ये लावला . त्यानंतर 1954 मध्ये या लेण्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे . संध्याकाळी येथे डोंगराच्या पलीकडे होणारा सूर्यास्त आणि गुहेवर वर्षाव झालेले सोनेरी सूर्यकिरण , आसमंतात भरून राहणारी शांतता , संथ वाहणारी नदी असे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते . हे ठिकाण पालीपासून सुमारे 14 किमी अंतरावर आहे .
6 ) सिद्धेश्वर मंदिर
हे एक प्राचीन यादवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे . हे मंदिर यादव वंशाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते . त्यामुळे या मंदिराला 'यादवकालीन मंदिर' असेही म्हटले जाते . मंदिराचे बांधकाम हे काळा दगड आणि लाकडाचे पाहावयास मिळते . येथे महाशिरात्रीमध्ये मंदिराला सुंदर अशी रोषणाई केली जाते . त्यामुळे वातावरण आनंदमय होऊन जाते . मंदिराच्या समोर एक दीपमाळ असून मागे एक तलाव पाहावयास मिळतो . हे एक शांत असे ठिकाण असून पालीपासून सुमारे 4 किमी अंतरावर आहे .
7) वरदायनी देवी मंदिर -उसर
वरदायनी देवी मंदिर हे सुधागड तालुक्यातील उसर गावातील एक प्राचीन जागृत देवस्थान आहे . येथील ग्राम देवता ही भक्तांच्या हाकेला धावणारी माता म्हणून ओळखली जाते . अखंड वाहाणारा झरा आणि रामकुंड हे येथील खास वैशिष्ट्य आहे. येथे अतिशय नयनरम्य परिसर असून मोठे माळरान पाहायला मिळते. विशेष म्हणजे कास पठार प्रमाणे येथे देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सुंदर अशी रानफुले फुललेली पाहायला मिळतात . हे मंदिर उसर गावापासून सुमारे 2 किमी अंतरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात आहे . येथे जाण्यासाठी चारही बाजूने जाता येते . सुधागड तालुक्यातून मढाळी येथून पायवाटेने, तर भावशेत ठाकुरवाडी येथून रस्त्याने या मंदिरापर्यन्त पोहचता येते .अलीकडच्या काळात भावशेत ठाकुरवाडी पर्यन्त एस . टी . बसची सुविधा उपलब्ध आहे .बरेच पर्यटक भावशेत ठाकुरवाडी येथून पायी चालत किंवा स्वत:च्या वाहनाने मंदिरापर्यंत पोहचतात .रोहा तालुक्यातून सुकेळी खिंडीतून वाघ्रणवाडी येथूनही पाय वाटेने या मंदिरात पोहचता येते . या परिसरातील लोक नोकरी निमित्ताने मुंबई ,ठाणे ,पुणे येथे जात असतात . परंतु देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नेहमीच या मंदिरात येत असतात . निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या मंदिरात अनेक देवी देवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात. चैत्र पौर्णिमेला येथे उत्सव भरतो . देवीच्या दर्शनासाठी नेहमीच सुधागड व रोहा तालुक्यातून असंख्य भक्तगण येत असतात . ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम असे ठिकाण आहे. येथील धबधबा ' वरदायनी वॉटर फॉल' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा आहे.
8 ) ठाणाळे लेणी
रायगड -पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली ही लेणी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. ही लेणी इ. स. पू. पहिल्या शतकातील असल्याचे समजते. ही लेणी 'नाडसूर लेणी' या नावाने देखील ओळखली जातात . ही लेणी पालीपासून वायव्येस सुमारे 25 किमी अंतरावर आहेत. येथे जाताना तीन मार्गाने जाता येते. एक म्हणजे खोपोली -जांभूळपाडा- नवघर मार्गे ठाणाळे. दुसरा मार्ग खोपोली -पेडली -नवघर मार्गे ठाणाळे, तर तिसरा मार्ग पाली-एकवीस गणपती मंदिर- नाडसूर मार्गे ठाणाळे असा आहे . ठाणाळे गावात आल्यानंतर पुढे वाटेने डोंगरात जवळजवळ 4 ते 5 किमी वर घनदाट जंगलात ही लेणी खोदलेली आहेत. येथे एकूण 23 लेण्यांचा समूह असून त्यात चैत्यगृह , स्मारक स्तूप व विहार यांचा समावेश आहे. ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी याच लेण्यांचा आश्रय घेतला होता. या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्य कलेचा प्रभाव दिसून येतो. लेण्यांमधील काही शिल्पे सुबक आहेत तर काही शिल्पे पूर्णावस्थेत नाहीत. ही लेणी पूर्वीच्या व्यापारी मार्गावर असल्यामुळे या लेण्यांना पूर्वी खूपच महत्त्व होते. येथील एका भिंतीवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख पहावयास मिळतो. तर सभागृहाच्या भिंतीवर विविध प्राणी व मानवी आकृत्या पाहायला मिळतात.सभागृहाच्या छतावर कोरलेले झुंबराचा आभास निर्माण करणारे शिल्प कातळकलेचा सर्वोत्तम आविष्कार म्हणावा लागेल. लेण्यांच्या पठारावरून अप्रतिम असे दृश्य पहावयास मिळते. वर्षभरात या लेण्यांना केव्हाही भेट दिली तरी ती अप्रतिमच वाटतात .
9) गरम पाण्याचे झरे - उन्हेरे
निसर्गाचा चमत्कार समजले जाणारे गरम पाण्याचे झरे- उन्हेरे हे ठिकाण पालीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर आहे . येथे एकूण तीन कुंडे असून त्यातील एक कुंड थंड पाण्याचे आहे ,तर दोन कुंड गरम पाण्याचे आहेत . यातील थंड पाण्याचे कुंड व गरम पाण्याचे कुंड असे दोन कुंड बाहेरील बाजूस उघड्यावर आहेत . तिसरे कुंड बंदिस्त असून त्यामध्ये महिला व पुरुष असे दोन भाग केले आहेत . येथे पृथ्वीच्या भूगर्भातून येणारे गंधक मिश्रित पाणी हे आरोग्यदायी आहे. सर्व ऋतूंमध्ये आणि सर्वकाळ स्नानासाठी गरम पाणी उपलब्ध असल्यामुळे येथे स्थानिकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. पर्यटक व सहलीला येणारे विद्यार्थी येथे मनसोक्त आनंद घेताना दिसतात. गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार बरे होतात असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह देश - विदेशातून अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात . कुंड परिसरात विठ्ठलाचे मंदिर असून कुंडाच्या समोरच्या बाजूला अंबा नदी वाहाते . येथे पूर्वी मोठी यात्रा भरत होती . बाजूला वृक्षराजी आणि शेती असल्यामुळे येथील वातावरण नसर्गरम्य व आल्हाददायक असते . पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भक्तगण या ठिकाणाला आवर्जून भेट देतात .
10 ) मृगगड
सुधागड तालुक्यात असलेला हा डोंगरी किल्ला लोणावळा व खोपोली पासून अगदी जवळ आहे. घनदाट जंगलात असलेला हा किल्ला कमी प्रसिद्ध असलेला किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी भेलीव नावाचे गाव असल्यामुळे हा किल्ला 'भेलीवचा किल्ला' म्हणून देखील ओळखला जातो. भेलीव गावात जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांची सोय उपलब्ध नाही ,परंतु गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही येथे स्वतःच्या वाहनाने पोहचू शकता. या किल्ल्यावर चढण्यासाठी दीड तास आणि उतरण्यासाठी एक तास लागतो. हा एक सोपा आणि छान असा ट्रेक आहे. ट्रेकच्या दरम्यान किंवा किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा स्नॅक्स किंवा जेवणाचे पर्याय उपलब्ध नाहीत. किल्ल्याच्या माथ्यावर जुने शिवमंदिर , पाण्याच्या टाक्या व बालेकिल्ल्यात वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्यावर चढताना डाव्या बाजूला तळाशी गुहा पाहायला मिळते. पावसाळ्यात तुम्हाला या किल्ल्यावरून अप्रतिम असा नजारा पाहायला मिळतो . निसर्गरम्य धबधब्यांनी वेढलेले हे ठिकाणआणि हिरवेगार डोंगर, दऱ्या आणि पाऊस अंगावर झेलत केलेला किल्ल्यावरचा ट्रेक काही औरच असतो. जर तुम्ही उन्हाळ्यात या किल्ल्याला भेट दिली तर नदीकाठी रात्री कॅम्पिंग आणि नदीत पोहण्याचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. या किल्ल्यावर पर्यटकांची फारशी गर्दी नसते, परंतु ज्यांना कमी गर्दीची ठिकाणे आवडतात त्यांच्यासाठी हे एक शांत असे ठिकाण आहे. येथून जवळच असलेल्या इतिहास कालीन उंबरखिंड या ठिकाणाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.
11 ) श्री विरेश्वर मंदिर-आसरे
पाली - खोपोली मार्गावर असलेल्या पेडली या गावातून श्री विरेश्वर मंदिर-आसरे हे ठिकाण सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे जांभूळपाडा येथून आणि दुसरा मार्ग पेडली गावातून जातो. हे सुद्धा भगवान शिव शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या कंपाऊंडमध्ये एक तलाव असून त्या तलावामध्ये एक विहीर पाहायला मिळते. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून हे मंदिर सुमारे 200 ते 250 वर्षे जुने असावे. या मंदिरात एक मोठे शिवलिंग असून अनेक देवांच्या मूर्ती आणि चित्रे पाहायला मिळतात.महाशिवरात्रिला येथे यात्रा भरते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भक्तगण इथे दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रावणी सोमवारी देखील या मंदिरात भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ पाहायला मिळते. आपण जर पाली येथे आलात तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या.
12) रामेश्वर मंदिर ( वरचा रामेश्वर )
सुधागड तालुक्यातील उंचावर असलेले आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले नयनरम्य असे हे ठिकाण आहे . हे ठिकाण 'वरचा रामेश्वर' म्हणून ओळखले जाते. हे अप्रतिम असे मंदिर असून छोटासा ट्रेक करत तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता.ट्रेक करताना एखाद्या ठिकाणी बसून समोरचे नयनरम्य दृश्य अनुभवायला मात्र विसरू नका . हे मंदिर पाली पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर भगवान शिव शंकराचे असून ते इसवी सन 16 65 मध्ये बांधले असल्याचे समजते. जेव्हा श्रीराम सीतेच्या शोधात निघाले होते . तेव्हा जखमी अवस्थेतील जटायूची भेट इथेच झाली होती अशी आख्यायिका सांगितली जाते . तसेच राणी येसुबाई संभाजी महाराजांना घेऊन याच मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या आणि काही काळ मुक्कामही केला होता . या मंदिराकडे जाण्यासाठी उद्धर मार्गे आणि दुधनी- खेमवाडी-घोडगाव रस्त्यावरून रामेश्वर फाटा असे दोन मार्ग आहेत. हे ठिकाण डोंगरावर आणि जंगलात असल्यामुळे खूपच शांतता असते. येथील निसर्गरम्य परिसरामुळे या मंदिराची शोभा आणखीनच खुलून दिसते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी अलीकडे नवीन रस्ता तयार करण्यात आलेला आहे . हा रस्ता उद्धर गावातून गेलेला असून घाटरस्ता आहे. येथे पोहोचायचे झाल्यास बाईकचा वापर करून पोहोचता येते, परंतु घाट रस्ता असल्यामुळे येथे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग स्किल असणे खूपच गरजेचे आहे . हा परिसर सतत हिरवाईने नटलेला निवांत, एकांत आणि शांत असतो. मंदिराशेजारीच थंड पाण्याचा झरा आणि कुंड पाहावयास मिळतो. फेब्रुवारी- मार्च महिन्यात झाडावेलींना लागलेल्या फुलांमुळे इथला परिसर अगदी मनमोहक होऊन जातो. उद्धर गावात सुद्धा शिवशंकराचे एक मंदिर आहे येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते . तर निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्या.
हे सुद्धा वाचा : कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे
Post a Comment