कवदर किंवा रानकेळी फुलांची भाजी कशी बनवावी ?

 


                 कवदर किंवा रानकेळी फुलांची भाजी कशी बनवावी ?

                          भारतीय स्वयंपाकात पारंपरिक रानभाज्यांना विशेष महत्वाचे स्थान आहे . गावाकडच्या मातीत ,जंगलात आणि शेतामध्ये सहज उगवून येणाऱ्या अनेक झाडांची फुले , कंद ,खोड आणि फळे इत्यादी भाजी म्हणून उपयोग केला जातो . यापैकीच एक खास रानभाजी म्हणजेच कवदर किंवा रान केळीची फुलं. कवदर किंवा रानकेळीचे झाड केळीप्रमाणेच दिसते म्हणून त्यांना 'रानकेळी' म्हणतात ,परंतु ते उंचीला कमी असते . ही वनस्पती जास्तकरून डोंगर उतारावर ,दरीमध्ये आणि कडेकपारीत अडचणीच्या जागी उगवते . याचे कंद मरत नाहीत . पावसाळा सुरू झाला की रानकेळी आपोआप उगवतात . याची पाने केळीसारखीच लांब असतात . ग्रामीण भागात रानकेळीच्या पानांचा उपयोग जेवताना पत्रावळी म्हणूनही केला जातो .या वनस्पतीला कवदर ,रानकेळी तसेच wild Banana अशा अनेक नावांनी ओळखले जाते . या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Ensete Superbum असून ती musaceae  कुळातील आहे. ही वनस्पती भारतातील पश्चिमघाट आणि दक्षिण भारतातील टेकड्यांमध्ये आढळते . रान केळीची फळे केळी प्रमाणेच असतात, परंतु ती आकाराने छोटी असतात. यामध्ये काळ्या रंगाच्या छोट्या छोट्या बिया असतात. रान केळीची फळे खाल्ली जातात. त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात.


कवदर /रानकेळी


                         महाराष्ट्रामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेश या ग्रामीण भागात आजही कवदर किंवा रान केळीची फुलं यांची भाजी मोठ्या प्रेमाने खाल्ली जाते. शहरांमध्ये या भाजीचे नाव सुद्धा अनेकांना माहीत नसेल, पण ही भाजी एकदा खाल्ली की तिची पौष्टिकता , चवदारपणा आणि तृप्ती मनात कायमची राहते. या लेखात आपण पाहणार आहोत-

1 . कवदर/ रानकेळी फुलांची ओळख

2. आरोग्यदायी फायदे

3 . भाजीसाठी लागणारे साहित्य व तयारी

4 . स्टेप -बाय - स्टेप पाककृती

5 . उपयुक्त टिप्स

6 . निष्कर्ष


Wild Banana


1) कवदर /रानकेळी फुलांची ओळख

                        कवदर किंवा रान केळीच्या झाडावर लागणारा सोंडगा हा जांभळट गर्द रंगाचा असतो. याच सोंडग्यामध्ये असलेल्या बारीक कोवळ्या कळ्या भाजीसाठी वापरल्या जातात. जाडसर आवरणासह असलेल्याआतील कळ्या या पांढरट व पिवळसर रंगाच्या असतात. यांची चव किंचित कडवटसर पण शिजवल्यानंतर छान रुचकर असते.


2) आरोग्यदायी फायदे

                        या भाजीमध्ये कॅल्शियम ,लोह ,मॅग्नेशियम,सोडियम आणि झिंक , नायट्रोजन ,पोटॅशियम आणि फॉस्फरस ही खनिजे मोठ्याप्रमाणावर असतात . रोगप्रतिकारक शक्ती वाढते . मूतखडा, अन्न विषबाधा ,कुत्रा चावणे ,थंडी वाजून येणे ,थकवा यासारख्या आजारांवर गुणकारी आहे . बियांची पावडर कुत्रा चावलेल्या जखमेवर लावतात .या भाजीमध्ये विटॅमिन B 1, B 2, B6, आणि C मोठ्या प्रमाणावर असते.


जंगली केळी



3 ) भाजीसाठी लागणारे साहित्य व तयारी

  • कवदर फुल -1 मोठे ( किंवा 2 मध्यम )
  • कांदा - 2 मध्यम आकाराचे ( बारीक चिरलेले )
  • लसूण - 5-6 पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या - 3-4
  • किसलेलं नारळ - 1/2 वाटी
  • हळद - 1/2 चमच
  • लाल तिखट - 1 चमच
  • धनापावडर - 1 चमच
  • जिरे - 1/2 चमच
  • मोहरी - 1/2 चमच
  • मीठ - चवीनुसार
  • तेल - 2 मोठे चमच


तयारी :-

रानकेळीचे फुल स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं काम आहे. योग्य तयारी केली तर भाजी सुद्धा चविष्ट बनते.

1) प्रथमत: सोंडग्याचे बाहेरचे आवरण काढा.

2 ) आवरण बाहेर काढल्यानंतर आतल्या कोवळ्या पांढऱ्या कळ्या वेगळ्या करा.

3 ) प्रत्येक कळीमध्ये असलेले कडक टोक व मधला धाग्यासारखा असणारा पातळ भाग काढून टाका.

4 ) कळ्या बारीक चिरून घ्या.

5 ) चिरलेली फुलं लिंबाच्या रसाच्या पाण्यात टाका . यामुळे कडवटपणा कमी होतो. 


कवदर


4) स्टेप-बाय-स्टेप पाक कृती 

1) चिरलेली फुलं उमवून घेऊन पिळावीत .

2 ) त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडली की जिरे घाला.

3 ) त्यानंतर बारीक चिरलेला कांदा व लसूण परतून घ्या.

4 ) कांदा सोनेरी झाला की हिरव्या मिरच्या व हळद घाला.

5 ) आता त्यात पिळून घेतलेली भाजी टाका व चांगलं परतून घ्या.

6 ) त्यावर लाल तिखट, धना पावडर घालून व्यवस्थित ढवळा.

7 ) त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्या.

8) मध्ये एक-दोन वेळा हालवून घ्या.

8 ) आता झाकण काढून त्यावर किसलेलं नारळ व मीठ घालून नीट मिसळा.

9 ) फक्त 8 ते 10 मिनिटांत भाजी तयार होते.

                       ही भाजी भाकरी , चपाती किंवा भातासोबत खूप चविष्ट लागते.रानकेळीची फळे सोलून कापून त्यापासूनही रस्सा किंवा सुकी भाजी बनवली जाते . या भाजीमध्ये जर सुकट ,बोंबील किंवा खेकडी टाकल्यास अधिक स्वादिष्ट बनते . तसेच रानकेळीच्या फुलांचा दांडा म्हणजेच काला कोवळा असताना सोलून काकडीसारखा कच्चा खाल्ला जातो .


कवदर


5 ) उपयुक्त टिप्स 

1 ) रान केळीच्या सोंडग्यातील फुलं नेहमी कोवळी व ताजी घ्यावीत.

2 ) फुलं चिरल्यानंतर लगेच लिंबाच्या रसात घातली नाही तर भाजी काळपट पडते.

3 ) नारळ व लसूण वापरल्यास भाजीला खास चव येते.

4 ) जास्त पाणी घालू नये- ती  स्वतःच्या पाण्यात शिजते.

5 ) आंबटपणा हवा असल्यास चिंच वापरावी.

6 ) थोडा गूळ टाकल्यास तुरटपणा कमी होतो.


FAQ:

1) कवदर किंवा रानकेळी फुलं म्हणजे काय ?

उत्तर :कवदर ही एक जंगली केळीची जात आहे . तिची जांभळट सोंडग्यामध्ये असलेल्या फुलांची                  भाजी बनवली जाते .

2) कवदर फुलांची भाजी कोणत्या ऋतूमध्ये मिळते ?

उत्तर : पावसाळा ऋतूत ही फुले सहज मिळतात .

3 ) कवदर फुले स्वच्छ करताना काय काळजी घ्यावी ?

उत्तर : फुले चिरताना त्यातील कडक टोक व धाग्यासारखा भाग काढून टाकावा . नंतर चिरलेली फुले                लिंबाच्या रसाच्या पाण्यात टाकावी ,म्हणजे कडवटपणा कमी होतो .


6 ) निष्कर्ष :

                     कवदर किंवा रानकेळी ही गावाकडच्या मातीत सहज उपलब्ध होणारी रानभाजी आहे. ही भाजी चवीला वेगळी, पौष्टिकतेने परिपूर्ण आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शहरी भागात आपण बहुतेक पालेभाज्या किंवा नेहमीच्या भाज्यांवर अवलंबून असतो, पण अशा प्रकारच्या रानभाज्या खाल्ल्याने आहारात विविधता तर येतेच, शिवाय आपल्या परंपरेची, मातीशी एक वेगळं नातं जुळतं.

                      म्हणूनच पुढच्या वेळी तुम्हाला बाजारात किंवा गावाकडे कवदराचा सोंडगा दिसला तर नक्की घ्या आणि ही पारंपारिक , चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी करून बघा.

संदर्भ : https ://ooofarms.com \




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Blogger द्वारे प्रायोजित.