रायगडचे 10 भन्नाट धबधबे - पावसाळ्यात एकदा तरी नक्की भेट द्या ! |Top 10 waterfalls in Raigad district to visit in rainy season

 

रायगडचे 10 भन्नाट धबधबे - पावसाळ्यात एकदा तरी नक्की भेट द्या !


                  पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव किंवा चमत्कार ! हिरव्यागार डोंगररांगा आणि पाण्याने भरून वाहणाऱ्या नद्या तसेच हवेत पसरलेला गारवा या सगळ्यांत एक वेगळीच जादू असते. या ऋतूमध्ये महाराष्ट्रात पर्यटकांची पावले आपोआपच निसर्गाकडे वळतात. हा निसर्ग जणू काही त्यांना सादच घालत असतो. पण त्यातही रायगड जिल्हा म्हणजे निसर्गप्रेमी आणि साहसी प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. येथील रायगड किल्ला जितका प्रसिद्ध आहे, तितकेच अप्रतिम आहेत इथले धबधबे. पावसाळा सुरू होताच जणू काही हे धबधबे जिवंत होतात. उंच डोंगरावरून कोसळणारे पाणी, आजूबाजूला धुक्याची पडलेली झालर आणि डोंगरातून वाहणारे झरे हे सगळे पाहताना पर्यटक निसर्गात हरवून जातात. देवकुंड , नाणेमाची,कुंभे अशा असंख्य धबधब्यांनी सजलेला रायगड हा ट्रेकर्स , फोटोग्राफर्स आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक वरदान ठरला आहे .

                 आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत रायगडमधील अशाच 10 भन्नाट धबधब्यांची सैर , जे तुम्हाला थरार ,सौंदर्य आणि आत्मशांती या तिन्ही गोष्टींचा अद्वितीय अनुभव देतील. ही ठिकाणं केवळ फिरण्यासाठी नाहीत तर पावसाळ्यात निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव देणारी ठिकाणं आहेत- जी प्रत्येकाने पावसाळ्यात एकदा तरी नक्की बघायलाच हवी ! तर मग निघा, पावसाच्या सरींसोबत निसर्गाच्या कुशीत हरवून जाणाऱ्या रायगडच्या धबधब्यांचा अनुभव घेण्यासाठी !


Devkund waterfall


1) देवकुंड धबधबा


देवकुंड धबधबा हा महाराष्ट्र राज्यातील कोकणातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे . हा प्रसिद्ध असलेला धबधबा भिरा- पाटणूस ( माणगांव तालुका ) येथे आहे . काही वर्षांपूर्वी सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर या ठिकाणी दरवर्षी पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा धबधबा म्हणजे तरुणाईच्या मनाला भुरळ घालणारा आणि तरुणाईचे आवडीचे ठिकाण म्हणून नेहमीच खुणावत असतो . हे ठिकाण म्हणजे कुंडलिका नदीचे उगमस्थान मानले जाते . त्याची ऊंची अंदाजे 80 - 90 फुट आहे .हे एक कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे . देवकुंड धबधब्यावर पोहोचण्यासाठी दाट जंगलातून धरणाच्या बाजूने साधारण तीन तास चालावे लागते .पाटणूस गावापासून सुरवात केल्यास तुम्हाला अंदाजे 5-6 किमी प्रवास करावा लागतो . जंगलातून चालताना नदी समांतर वाहताना दिसते . धबधब्यापर्यंत जाताना तीन ओढे ओलांडून सुद्धा जावे लागते . त्यामुळे पावसाळ्यात हा ट्रेक जीवघेणा ठरू शकतो . आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे ट्रेक करताना मार्गदर्शकाची आवश्यकता असते .पाटणूस गावातून मार्गदर्शक उपलब्ध होतात . बराचसा ट्रेक हा सपाट भूभागावर करावा लागतो . उंच कड्यावरून खाली कोसळणाऱ्या निळ्या पाण्यामुळे एक अविश्वसनीय दृश्य येथे पाहायला मिळते. मुंबईहून हे ठिकाण सुमारे 131 किमीअंतरावर आहे . तर पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 101 किमी अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण वसलेले आहे . पाली ( अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती मंदिर ) येथून हे ठिकाण सुमारे 26 किमी अंतरावर आहे .


ठिकाण : पाटणूस गाव ,माणगाव तालुका, रायगड जिल्हा ,महाराष्ट्र राज्य.


वैशिष्ट्ये :भव्य धबधबा ,धबधब्याखाली तयार झालेला नैसर्गिक तलाव ,स्वच्छ निळसर पाणी ,मजेदार आणि रोमांचक ट्रेक अनुभव.


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


देवकुंड धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

मुंबई - वाशी -पुणे एक्सप्रेस वे - खालापूर -पाली - पाटणूस


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

पुणे - कोथरूड -पिरंगुट-मुळशी -ताम्हिणी घाट - पाटणूस


जवळचे रेल्वे स्टेशन : खोपोली व नागोठणे


Kumbhe waterfall


2 ) कुंभे धबधबा


मुंबई आणि पुण्याजवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे गावाजवळ असलेला हा धबधबा आपल्या सौंदर्याने मनमोहून टाकणारा आहे . सुमारे 170 ते 180 फूटावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचा आवाज आणि दृश्य मनाला भारावून टाकते. कुंभे नावाच्या गावावरुन ह्या धबधब्याला 'कुंभे धबधबा' असे नाव पडले आहे . माणगाव ते कुंभे हे अंतर जवळ जवळ 23 किमी आहे . मुंबई ते कुंभे धबधबा 138 किमी तर पुणे ते कुंभे धबधबा 117 किमी अंतर आहे . पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे माणगावकडे येताना निजामपूर गावातून कुंभेकडे वळता येते .जरी हा धबधबा मुंबई आणि पुणे या दोन्हीही ठिकाणापासून दूरअसला,तरी सुद्धा येथे सर्वाधिक पर्यटक हे ह्याच शहारांमधून येतात .वाहने थेट धबधब्याजवळ जात असल्यामुळे ट्रेक करण्याची गरज पडत नाही . परंतु येथून तुम्हाला धबधब्याचा फक्त माथा पाहायला मिळतो . तुम्हाला संपूर्ण कुंभे धबधब्याचे सौंदर्य अनुभवायचे असेल ,तर जवळपास एक किमी अंतरावर असलेल्या व्ह्युव पॉइंटवर जावे लागते,तिथून दिसणारे दृश्य न विसरण्यासारखे असते . या पॉइंटवर पोहचणे सहज सोपे आहे . येथे अजून एक 'कुंभे धबधबा घुमट' व्ह्युव पॉइंट आहे ,जो सोशल मिडियावर अत्यंत वेगाने लोकप्रिय होत आहे . या घुमटावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत ते दोन्हीही जीवघेणे ठरू शकतात .मात्र या घुमटावरून समोरच्या धबधब्याचे अतिशय सुंदर दृश्य पाहाता येते . अनेक पर्यटक-ट्रेकर येथे रॅप्लिंगचा थरारक अनुभव घेताना दिसतात . जास्त पावसामुळे ओढ्याचा जोर अधिक असेल तर ओढा ओलांडून जाणे धोकादायक ठरू शकते . येथील खडक निसरडे असल्यामुळे सावधगिरी बाळघावी लागते . रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधबा म्हणजे निसर्गरम्य पिकनिकसाठी ,कॅम्पिंगसाठी आणि फोटोग्राफीसाठी असलेले एक परिपूर्ण ठिकाण आहे . दक्षिणेकडील 'वारीसु' या चित्रपटात या धबधब्याचे चित्रीकरण करण्यात आले होते .


ठिकाण : कुंभे गाव , माणगाव तालुका , रायगड जिल्हा ,महाराष्ट्र राज्य


वैशिष्ट्ये : गाडीतून उतरल्याबरोबर थेट धबधब्याचे दर्शन ,जंगलातून आणि हिरवळीतून ट्रेक , खडकाच्या घुमटावरून धबधब्याचे अप्रतिम दृश्य पाहण्याचा अनुभव ,सह्याद्रीमध्ये लपलेले एक रत्न , फोटोग्राफीसाठी एक परिपूर्ण ठिकाण .


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


कुंभे धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

मुंबई - वाशी -मुंबई -गोवा एक्सप्रेस वे - पेण-माणगाव - कुंभे गाव


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

पुणे - कोथरूड -पिरंगुट-मुळशी -ताम्हिणी घाट - निजामपूर - कुंभे गाव


जवळचे रेल्वे स्टेशन : माणगाव


Morzot waterfall


3 ) मोरझोत धबधबा


रायगडच्या भन्नाट 10 धबधब्यांपैकी 'मोरझोत' हा धबधबा पोलादपूर तालुक्यात असलेला एक प्रसिद्ध धबधबा आहे .मोराच्या पिसाऱ्यासारखा आकार या धबधब्याला लाभलेला असल्यामुळे त्याला 'मोरझोत' असे म्हणतात . तसे पाहिले तर पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यात असंख्य धबधबे निर्माण होतात ,परंतु या धबधब्यांपैकी आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो म्हणजे उमरठ पासून जवळच असलेला मोरझोत धबधबा . चांदके आणि खोपड या उमरठ जवळील गावांच्या मधोमध असलेला हा धबधबा जवळपास 200 फुट उंचीवरुन खाली कोसळतो . येथे निर्माण झालेल्या नैसर्गिक गुहेत पन्नासहून अधिक माणसे एकत्र बसू शकतात . येथील आजूबाजूचा हिरवागार परिसर आपल्याला एका अनोख्या विश्वाची सफर घडवितो . येथे येणारा प्रत्येक पर्यटक उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या समाधीला नमस्कार करूनच मोरझोत धबधब्याकडे जातो . हा धबधबा एखाद्या मोरासारखा रंगीबेरंगी पिसारा फुलून आनंदाने नृत्य करत असल्याचा भास होतो . या धबधब्याच्या फेसाळ तुषारांमध्ये स्नानाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळते . वाहनाने पोहोचण्याजोगे ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटकांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळते . धबधब्याच्या परिसरात तीव्र उतार व निसरड्या खडकांमुळे पर्यटकांनी सावधगिरीने वावरावे . हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी असून ,योग्य नियोजन व विकास केल्यास स्थानिक रोजगारालाही चालना मिळू शकते . पुण्याहून हा धबधबा सुमारे 155 किमी अंतरावर आहे ,तर मुंबईहून सुमारे 192 किमी अंतरावर आहे .


ठिकाण : पोलादपूर तालुका , रायगड जिल्हा , महाराष्ट्र राज्य .


वैशिष्ट्ये :आकर्षणाचा मानबिंदू ,नैसर्गिक गुहा , नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी जवळच आहे ,मोऱ्याच्या पिसाऱ्याप्रमाणे दिसणारा ,पावसाचा जोर वाढत जातो तसा धबधब्याचा आकारही वाढत जातो .


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


मोरझोत धबधब्यावर येणाचा मार्ग :


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

मुंबई - वाशी -मुंबई -गोवा एक्सप्रेस वे - पेण-माणगाव - महाड - पोलादपूर - कापडे - मोरझोत धबधबा


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

पुणे - वरंध घाट - पोलादपूर - मोरझोत धबधबा


जवळचे रेल्वे स्टेशन : वीर


Mandale waterfall


4 ) मांडले धबधबा


मांडले धबधबा हा महाडच्या जवळ असलेला एक आकर्षक आणि लहान असलेला, पोहोचण्यासाठी सुरक्षित ,निसर्गरम्य धबधबा आहे . हा धबधबा 'मंडप' या नावानेसुद्धा ओळखला जातो महाडमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. मुसळधार पावसात येथे जाणे धोक्याचे ठरू शकते. मांडले गावाजवळ असलेला हा धबधबा पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आणि शांत असल्यामुळे निसर्गरम्य ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून हा धबधबा दिमाखात खाली कोसळतो. मांडले हे गाव महाड शहराच्या उत्तरेला अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. मांडले गावात गाडी पार्क करून तेथून तुम्ही गाईडच्या मदतीने धबधब्यापर्यंत पोहोचू शकता. तीव्र पाण्याचा प्रवाह आणि निसरडे खडक असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. ज्यांना भिरा- पाटणूस येथील देवकुंडला जाता येत नाही त्या पर्यटकांसाठी हा धबधबा दुसरा पर्याय ठरू शकतो . पावसाळ्यात रायगडावर फिरायला आलेले अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देऊन निसर्गाचा आनंद घेत असतात. पुण्यापासून हा धबधबा सुमारे 134 किमी अंतरावर आहे तर मुंबईपासून सुमारे 165 किमी अंतरावर आहे.


ठिकाण : मांडले , तालुका महाड , जिल्हा रायगड ,राज्य महाराष्ट्र.


वैशिष्ट्ये : वक्राकार असलेला धबधबा, शांत आणि निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ आणि सुरक्षित परिसर, पावसाळी ट्रेकसाठी आणि फोटोग्राफीसाठी उत्तम,


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


मांडले धबधब्यावर येणाचा मार्ग :

धबधब्याकडे जाण्यासाठी महाड -रायगड रस्त्याने जात असताना उजव्या बाजूला वळून अंदाजे सात ते आठ किलोमीटरवर मांडले गावात हा धबधबा आहे. गावातून साधारणपणे दीड ते दोन किलोमीटर पायी चालत जावे लागते.


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

मुंबई - वाशी -मुंबई -गोवा एक्सप्रेस वे - पेण-माणगाव - महाड - रायगड रोड - मांडले धबधबा


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग -

पुणे - वरंध घाट - महाड - रायगड रोड - मांडले धबधबा


जवळचे रेल्वे स्टेशन : वीर


Nanemachi waterfall


5 ) नाणेमाची धबधबा


महाराष्ट्रातील सुंदर असलेल्या धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये लपलेला हा एक रत्न आहे. महाड पासून हा धबधबा सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा त्याच्या मनमोहक सौंदर्यासाठी आणि शांततेसाठी ओळखला जातो. या धबधब्याचा ट्रेक नवीन ट्रेकरसाठी सोपा आहे. येथील हिरवीगार हिरवळ ,ताजी हवा, उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा शांत आवाज यामुळे येथे एक अविस्मरणीय वातावरण निर्माण होते. रोजच्या धावपळीच्या जीवनापासून दूर आणि निसर्गात रमण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. नाणे माची हे पर्यटनस्थळ एक असे ठिकाण आहे जे कुटुंबासोंबत किंवा मित्रांसह भेट देणाऱ्या पर्यटकांना आवडते. येथील परिसर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि एक्सप्लोर करण्यासारखा असल्यामुळे सर्व वयोगटातील पर्यटक येथे भेट देत असतात.या धबधब्याचा ट्रेक करण्यासाठी घनदाट जंगलातून जवळजवळ 30 ते 45 मिनिटे चालावे लागते . हा ट्रेक मध्यम स्वरूपाचा आहे. निसर्गप्रेमी आणि साहसी लोकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा धबधबा सुमारे 400 फुटांवरून खाली असलेल्या तलावात कोसळतो. त्यामुळे एक नेत्रदीपक वातावरण येथे पाहायला मिळते. हे एक फोटोग्राफीसाठी आणि विश्रांतीसाठी उत्तम असे ठिकाण आहे. हा धबधबा जेव्हा पूर्ण क्षमतेने भरून वरुन कोसळतो तेव्हा तेथे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. येथे पर्यटक धबधब्याच्या तलावात पोहण्याचा आनंद घेऊ शकतात किंवा धबधब्याजवळच्या खडकावर बसून आराम करू शकतात. मुसळधार पावसात येथे जाणे धोक्याचे ठरू शकते. येथून तुम्ही सातसडा धबधब्याला सुद्धा भेट देऊ शकता. हा धबधबा मुंबईहून सुमारे 181 किलोमीटर आहे, तर पुण्याहून 135 किलोमीटर अंतरावर आहे.


ठिकाण : नाणेमाची ,गुगुलशी गाव , महाड तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य


वैशिष्ट्ये : खोल दरीतून कोसळणारा धबधबा, देवकुंडपेक्षा विशाल, तलावातील पाण्याची रंगसंगती सूर्यप्रकाशाच्या आणि पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे बदलते रूप , देवकुंड प्रमाणे निळसर आणि पारदर्शक तलाव, सौंदर्यात भर घालणारे सह्याद्री पर्वतरांगांचे मान्सूनमधील विहंगम दृश्य अनुभवता येते.


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


नाणेमाची धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

मुंबई - वाशी -मुंबई -गोवा एक्सप्रेस वे - पेण-माणगाव - महाड MIDC रोड - नाणेमाची धबधबा


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

पुणे -भोरघाट - वरंध घाट - महाड MIDC रोड - नाणेमाची धबधबा


जवळचे रेल्वे स्टेशन : वीर


Bhivpuri  Waterfall  Karjat


6 ) भिवपुरी धबधबा


रायगड मधील प्रसिद्ध धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे. हा धबधबा मुंबई-पुणे पासून जवळच असलेल्या कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे आहे. हा परिसर धबधब्यांसाठी ओळखला जातो. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर हा धबधबा असल्यामुळे येथे मुंबईचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. पर्यटकांचे पावसाळ्यात वीकेंडला भेट देण्याचे ठिकाण म्हणजेच भिवपुरी धबधबा हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे. पाण्याचा आवाज, आजूबाजूला असलेली हिरवळ , डोंगरांवर पडलेले धुके आणिअंगाला झोंबणारा थंडगार वारा यामुळे हे ठिकाण एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटते. हे एक कौटुंबिक सहलीसाठी उत्तम असे ठिकाण आहे. भिवपुरी हे एक छोटेसे गाव असले तरी ते रेल्वे स्टेशनने जोडलेले आहे, त्यामुळे या धबधब्यावर पोहोचणे पर्यटकांना सोपे जाते. या धबधब्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कर्जत वरून तुम्ही भिवपुरी धबधब्याकडे जाऊ शकता आणि दुसरा मार्ग म्हणजेच भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन पासून तुम्ही धबधब्यापर्यंत पोहोचू शकता. हे लोकप्रिय ठिकाण असल्यामुळे वीकेंडला येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ट्रेकर्स आणि साहसी प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही रॅपलिंग सुद्धा करू शकता. या धबधब्याचे 20 फुटावरून खालील खडकावर कोसळणाऱ्या पाण्याचे दृश्य मनमोहक असते. तुम्ही धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन पाण्याच्या फवाऱ्यात भिजून तेथील थराराचा आनंद घेऊ शकता. परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या तलावात जाणे जीवघेणे ठरू शकते. जर तुम्ही विकेंडला या धबधब्यावर जात असाल तर तेथे तुम्हाला राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.हा धबधबा मुंबईहून सुमारे 72 किमी अंतरावर आहे तर पुण्याहून सुमारे 108 किमी अंतरावर आहे .



ठिकाण : भिवपुरी , कर्जत तालुका ,रायगड जिल्हा ,महाराष्ट्र राज्य


वैशिष्टये: मुंबई व ठाणे पासून जवळ असलेला धबधबा, कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण, वीकेंडला पर्यटकांची प्रचंड गर्दी, रॅपलिंगचा अनुभव घेता येतो, 20 फुटांवरून खाली कोसळणारा धबधबा, धबधब्याच्या फवाऱ्यात भिजण्याचा आनंद घेता येतो.


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


भिवपुरी धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

मुंबई - पनवेल -कर्जत - भिवपुरी धबधबा


2) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

पुणे - लोणावळा - खोपोली - कर्जत - भिवपुरी धबधबा

जवळचे रेल्वे स्टेशन : भिवपुरी रोड ,कर्जत


रायगडचा झेनिथ  धबधबा - पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य


7 ) झेनिथ धबधबा


                           प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात आनंद पाहिजे असतोआणि तो आनंद माणूस वेगवेगळ्या मार्गाने मिळवत असतो. कोणाला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याचा तर कोणाला निसर्गात फिरताना आनंद मिळतो. निसर्गात फिरताना माणसाला निसर्गातील डोंगर -दऱ्या, झाडे, वेली, पशुपक्षी ,प्राणी यांचा सहवास मिळतो आणि त्यातून त्याला आनंद मिळतो. पावसाळा ऋतू म्हटला की आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात फिरायला खूपच आवडते. मग ते ट्रेकिंग असो किंवा एखाद्या धबधब्याला भेट देणे असो. असाच एक रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांच्या रांगांवर वसलेला एक सुंदर धबधबा म्हणजेच खोपोली येथील झेनिथ धबधबा होय. हा धबधबा मुंबई-पुणे एक्सप्रेस पासून साधारणपणे 4  ते 5  किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा केवळ पावसाळ्यातच प्रभावित होतो. खोपोली हे शहर औद्योगिक शहर असून त्याला 'वॉटरफॉल चा शहर' या नावाने सुद्धा ओळखले जाते. या धबधब्याला 'झेनिथ' हे नाव येथील झेनिथ इंडस्ट्रियल इस्टेटच्या नावावरून पडले आहे. हा धबधबा सह्याद्री पर्वतरांगावरून साधारणपणे 25 ते 30 फूट उंचीवरून खाली कोसळतो. हे एक शांत निसर्गरम्य आणि साहसी ठिकाण आहे. पावसाळ्यात एका दिवसात निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायचे असल्यास हे योग्य ठिकाण आहे. हा धबधबा खोपोली रेल्वे स्टेशनपासून पूर्वेला साधारणपणे 20 मिनिटे अंतरावर आहे. येथून जवळच असलेल्या लोणावळा ,खंडाळा ,कर्जतमधील धबधबे व किल्ले ,इमॅजिका वॉटर पार्क व थीम पार्क ,राजमाची किल्ला , एकविरा देवी मंदिर व कार्ला लेणी इत्यादी पर्यटन स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

ठिकाण : खोपोली, खालापूर तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य.


वैशिष्ट्ये : सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला , घनदाट जंगल ,हिरवेगार डोंगर व धुक्याचे नयनरम्य दृश्य. फोटोग्राफी ,पिकनिक, स्नान आणि निसर्ग निरीक्षण साठी उत्तम. ला, मुंबई-पुणे एक्सप्रेस पासून साधारणपणे चार ते पाच किलोमीटर अंतरावर, 

भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


झेनिथ धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1 ) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग
मुंबई -पनवेल- खोपोली -झेनिथ धबधबा

2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग
पुणे - लोणावळा- खोपोली - झेनिथ धबधबा

जवळचे रेल्वे स्टेशन : खोपोली 


Adai  Waterfall  Panvel


8 ) आदई धबधबा


मुंबई-गोवा महामार्गावर असलेला आदई धबधबा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. वीकेंडला शेकडो लोक येथे हजेरी लावतात. येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे हे ठिकाण एक पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते.कुटुंब आणि मित्रांसोबत जाण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. हा धबधबा पनवेलमधील आदई गावात असून पनवेल पासून सुमारे चार किलोमीटर तर खांदेश्वर पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. पनवेल रेल्वे स्टेशनपासून हा धबधबा सुमारे चार किमी अंतरावर आहे. या धबधब्यावर जायचे असेल तर आदई गावात पोहोचल्यानंतर थोडासा ट्रेक करावा लागतो. वर टेकडीवर गेल्यानंतर पनवेलचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. सभोवतालचा परिसर पिकनिक आणि आराम करण्यासाठी योग्य आहे. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मुंबईजवळील एक दिवसाच्या पिकनिकसाठी हा एक चांगला पर्याय आहे. धबधब्याचा सुंदर प्रवाह आणि त्याचा शांत असणारा आवाज, तेथील हिरवेगार दृश्य, डोंगरांभोवती पडलेल्या धुक्याचे दृश्य आणि ओल्या मातीचा सुगंध पर्यटकांना आकर्षित करत असतो . हा धबधबा मुंबईहून सुमारे 47 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 127 किलोमीटर अंतरावर आहे.


ठिकाण :आदई गाव-नवीन पनवेल ,तालुका पनवेल, जिल्हा रायगड ,राज्य महाराष्ट्र .


वैशिष्ट्ये : पनवेल पासून जवळ असलेला धबधबा, नवशिक्या ट्रेकरसाठी योग्य, सौंदर्य अतिशय सुंदर, डोंगर कड्यातून वाहणारा धबधबा, नैसर्गिक तलाव ,वन्यजीवन व निसर्ग निरीक्षण करण्यासाठी उत्तम .


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


आदई धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग :

मुंबई -पनवेल -आदई धबधबा


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग :

पुणे- लोणावळा- खोपोली -पनवेल -आदई धबधबा


जवळचे रेल्वे स्टेशन : पनवेल


Vardayini  Waterfall Khairwadi ,Roha


9 ) वरदायिनी धबधबा


सह्याद्रीच्या निसर्गरम्य रांगेत वसलेला सुंदर असा हा धबधबा आहे . वरदायिनी देवीच्या नावावरून या धबधब्याला हे नाव पडले आहे . वरदायिनी देवीचे दर्शन घेण्यासाठी देखील लोक दूरवरून येत असतात. हा धबधबा मुंबई-गोवा एक्सप्रेसला लागून सुकेळी खिंडीजवळ आहे. नागोठण्याहून कोलाडच्या दिशेने जाताना सुकेळी खिंडीजवळचा कालवा ओलांडून डावीकडे चार ते पाच मिनिटे अंतरावर असलेल्या खैरवाडी या छोट्याशा गावातून या धबधब्याचा मार्ग सुरू होतो . पावसाळ्यात निसर्ग सौन्दर्य अनुभवायचे असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. खैरवाडी या गावात तुम्ही तुमची वाहने सुरक्षितपणे उभी करू शकता. येथून साधारणत : एक ते दीड तासांचा पायी ट्रेक करून पूर्वेकडे असलेल्या डोंगरातून या धबधब्यापर्यंत तुम्हाला सहज पोहोचता येते . जंगलातून होणारा पायी प्रवास खूपच निसर्गरम्य वाटतो. धबधब्याकडे जाणारा रस्ता निसरडा असल्यामुळे सावधगिरीने चालावे लागते. मुसळधार पावसामध्ये या धबधब्याचा प्रवाह अधिक रौद्र बनतो. अशावेळी धबधब्यात भिजणे जोखमीचे ठरू शकते. डोंगर माथ्याचे आणि महाकाय धबधब्याचे विहंगम दृश्य अगदी जवळून न्याहाळता येते. हे ठिकाण नागोठणे येथून सुमारे 5 - 6 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हा धबधबा म्हणजे पावसाळ्यासाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. सुमारे 135-140 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा सुंदरपणे खाली कोसळताना पाहायला मिळतो. हा धबधबा मुंबईपासून सुमारे 97 किमी अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 138 किमी अंतरावर आहे.


ठिकाण : खैरवाडी गाव - सुकेळी ,रोहा तालुका , रायगड जिल्हा ,महाराष्ट्र राज्य .


वैशिष्ट्ये : मुंबई-गोवा एक्सप्रेस वे पासून जवळच असलेला धबधबा, सह्याद्रीच्या निसर्गरम्य रांगेत वसलेला सुंदर धबधबा, डोंगर माथ्याचे आणि महाकाय धबधब्याचे विहंगम दृश्य न्याहाळता येते, सोपा ट्रेक. नवशिक्यांसाठी चांगला.


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


वरदायिनी धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

मुंबई-पनवेल- पेण- नागोठणे -खैरवाडी- वरदायिनी धबधबा


2 ) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

पुणे-लोणावळा-खोपोली-पाली-वाकण-खैरवाडी-वरदायिनी धबधबा


जवळचे रेल्वे स्टेशन : नागोठणे


Bekare Waterfall Karjat


10) बेकरे धबधबा


                           महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील भिवपुरी येथे असलेल्या बेकरे या छोट्याशा गावाजवळ असलेला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. मुंबईआणि पुणे येथे राहणाऱ्या पर्यटकांसाठी हा एकदिवसीय पिकनिक स्पॉट म्हणून चांगला पर्याय आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनपासून बेकरे गावापर्यंत सुमारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचा ट्रेक करत जावे लागते. येथील ट्रेक हा अत्यंत सोपा आणि नवशिक्यांसाठी योग्य आहे. पावसाळ्यात हा धबधबा पूर्णपणे ओसंडून वाहतो आणि त्याचे पाणी जोरात खाली कोसळते. येथे सभोवतालीअसलेले दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, थंड वारा, आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे येथे येणारे पर्यटक काही वेळ निसर्गात हरवून जातात. धबधब्याच्या खाली एक नैसर्गिक तलाव तयार झाला आहे , त्यामध्ये पर्यटक पोहण्याचा आनंद घेतात. हे ठिकाण साहसी प्रेमींसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथे रॅपलिंग सारखे साहसी खेळ आयोजित केले जातात. पाण्याच्या प्रवाहात दोरीच्या साहाय्याने खाली उतरणे ही एक रॅपलिंग करणाऱ्यांसाठी अनोखी आणि थरारक अनुभूती असते. एवढेच नाही तर येथे ट्रेकिंग, फोटोग्राफी, मेडिटेशन हे देखील इथे येणारे पर्यटक आवडीने करत असतात. हा धबधबा कुटुंबासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. मुसळधार पावसात पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. मुंबईपासून हा धबधबा सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 109 किलोमीटर अंतरावर आहे.


ठिकाण : भिवपुरी रेल्वे स्टेशन -बेकरे गाव, कर्जत तालुका, रायगड जिल्हा ,महाराष्ट्र राज्य.


वैशिष्ट्ये : ट्रेकिंगचा आनंद व रॅपलिंगचा थरार अनुभव , निसर्गप्रेमीसाठी आणि फोटोग्राफीसाठी चांगला पर्याय , कुटुंबासाठी योग्य पर्याय असलेला धबधबा.


भेट देण्याचा कालावधी : जून ते सप्टेंबर


 बेकरे धबधब्यावर येण्याचा मार्ग :


1) मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

मुंबई- पनवेल -कर्जत- भिवपुरी स्टेशन रोड- बेकरे धबधबा


2) पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्ग

पुणे- लोणावळा- खोपोली -कर्जत- भिवपुरी स्टेशन रोड -बेकरे धबधबा

जवळचे रेल्वे स्टेशन : भिवपुरी रोड


निष्कर्ष :

                     रायगड जिल्हा हा केवळ ऐतिहासिक किल्ल्यांसाठी नाही तर, नैसर्गिक सौंदर्यासाठी सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे वाहणारे धबधबे जणूकाही निसर्गाने स्वतः रंगवलेली चित्रकृतीच आहे. साहस आणि निसर्ग प्रेमाच्या संगमसाठी देवकुंड, कुंभे धबधबा आणि नाणेमाची यासारखे लोकप्रिय धबधबे एक अनोखा बंध तयार करतात . ट्रेकिंगच्या मार्गाने जाताना जेव्हा धबधब्यांचा आवाज कानी गुंजतो, तेव्हा अनुभवलेली ती धबधब्यांची शांतता, डोंगरांची हिरवळ आणि थंडगार पाणी- हे सगळं प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमचं कोरलं जातं. रायगडचे 10 भन्नाट धबधबे म्हणजे एक पावसाळी ट्रेझर हंट आहे. तुम्ही जर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत असाल तर हे धबधबे तुमच्या आठवणी समृद्ध करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. थोडी तयारी, सावधगिरी आणि निसर्गाचा आदर या तीन गोष्टी मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवून, मग निघा, रायगडच्या या अद्भुत पावसाळी प्रवासासाठी !


FAQ :

प्रश्न 1 ला : रायगड जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध धबधबा कोणता आहे ?

उत्तर : देवकुंड धबधबा. 

प्रश्न 2 रा : रायगडमधील कोणते धबधबे कुटुंबासोबत जाण्यासाठी योग्य आहेत ?

उत्तर : बेकरे धबधबा, आदई धबधबा आणि मांडले धबधबा. 

प्रश्न 3 रा : धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गाईड लागतो का ?

उत्तर : होय, देवकुंड व नाणेमाची इत्यादी धबधब्यांपर्यंत जाण्यासाठी गाईडची आवश्यकता असते.

प्रश्न 4 था : रायगडमधील हे धबधबे पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती ?

उत्तर : जुलै ते सप्टेंबर हा हंगाम रायगडमधील धबधबे अनुभवण्यासाठी सर्वोत्तम असतो.


हे सुद्धा वाचा  :

                  1 ) पाली - सुधागड तालुक्यातील प्राचीन स्थळे 

                  2 ) कोकण किनारपट्टीवरील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Blogger द्वारे प्रायोजित.