Pages

रविवार, २२ जून, २०२५

कुड्याच्या शेंगांची भाजी | कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ?

  कुड्याच्या शेंगांची भाजी | कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ? 

                     महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जीवनशैली ही निसर्गाशी अतूट नातं निर्माण करणारी आहे . कोकण ,घाटमाथा ,मराठवाडा ,विदर्भ इत्यादी भागात विविध ऋतुंनुसार मिळणाऱ्या रानभाज्या हा आपल्या पारंपरिक आहाराचा एक अमूल्य असा भाग आहे .उन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानभाज्यांची खास चव जागी होण्याचा काळ . रानभाज्या सुरू होण्याचा काळ, तसेच ग्रामीण भागातील लोकांना या कालावधीत थोडाफार आर्थिक हातभार लागण्यासही मदत मिळते . डोंगरावर , माळरानावर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या कुड्याच्या शेंगांना बाजारात पाहिलं की , लहानपणाची आठवण आपसूकच जागी होते . आईने किंवा आजीने बनवलेली कुड्याच्या शेंगांची भाजी म्हणजे केवळ भूक भागवण्याचे साधन नाही तर ती एक आठवण आहे .ही भाजी खाल्ली की, नकळत गावाकडच्या मातीत पोहोचल्यासारखे वाटते आणि गावाकडच्या आठवणी जाग्या होतात .फायबरयुक्त ,पचनासाठी उत्तम आणि संपूर्णत: नैसर्गिक आहे .तसेच आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उपयुक्त मानली जाते .

कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ?|How  to make Kuda  Sheng Bhaji


                    आजही आजीच्या हातची कुड्याची शेंगांची भाजी आठवते ? तीच चव पुन्हा घरी आणा . चला तर मग ,आज आपण कुड्याच्या शेंगांची पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी अगदी घरच्या घरी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत .


कुड्याची शेंग म्हणजे काय ?

                         कुडा ही एक रानभाजी आहे . कुड्याची शेंग म्हणजे कुडा वनस्पतीला येणाऱ्या शेंगा .या शेंगा सहसा जून-ऑगस्ट महिन्यात कुडा वनस्पतीला लागतात . ही वनस्पती आपल्याला झुडुपाच्या स्वरूपात किंवा लहान वृक्षाच्या स्वरूपात आढळते . ही वनस्पती सहसा माळरानावर , विरळ जंगल आणि डोंगर उतारावर आढळते. याला उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाची फुले गुच्छांमध्ये येतात. या फुलांची सुद्धा भाजी बनवतात . तर शेंगा या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात . या हिरव्या रंगाच्या साधारणपणे 15-20 सेमी लांबीच्या बारीक आणि टोकदार असतात .शेंगा या जोडीने येतात . काही शेंगांवर बारीक पांढरे ठिपके असतात ,जे हाताचा स्पर्श केला असता खरबरीत असे जाणवतात . तर काही शेंगांवर तपकिरी करड्या रंगाचे पट्टे असतात . शेंगांची चव कडू असते . या शेंगा ग्रामीण भागातील महिला गोळा करून बाजारात विकायला आणलेल्या आपण पाहातो .

कुड्याच्या शेंगांची भाजी



कुड्याच्या शेंगांची भाजी कशी बनवावी ?

साहित्य :

कुड्याच्या शेंगा- 250 ग्रॅम

कांदा -1 (बारीक चिरलेला )

लसूण - 5-6 पाकळ्या

हळद - 1/4 टी स्पून

तिखट - 1 टी स्पून

तेल - 2 टेबल स्पून

मोहरी - 1/2 टी स्पून

जिरे - 1/2 टी स्पून

मीठ - चवीनुसार

कृती :

पायरी 1 : तयारी 

                         प्रथम कुड्याच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवा . त्यानंतर हाताला तेल लावा . कारण शेंगांना चीक असतो . नंतर शेंगा बारीक चिरून घ्या . चिरून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्यात धूऊन घ्या ,म्हणजे चीक निघून जाईल . चिरलेल्या शेंगा धूऊन झाल्यानंतर गरम पाण्यात वाफवून घ्या किंवा कुकरला 2-3 शिट्ट्या द्या . वाफवून घेतल्यानंतर त्यातील चीक मिश्रित पाणी काढून टाका .वाफवलेल्या शेंगा थोडावेळ थंड होऊ द्या . नंतर भाजी हाताने पिळून घ्या म्हणजे त्यातील कडवटपणा निघून जाईल . पिळून घेतल्यानंतर भाजी हाताने कुस्करून घ्या .

पायरी 2 : फोडणी तयार करा. 

                  कढईत तेल टाकून गरम करून घ्या . तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी व जिरे टाका . तडतड आवाज आल्यानंतर त्यात ठेचलेली लसूण टाका . लसूण थोडा खरपूस झाला की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून तो लालसर होईपर्यंत परता .

पायरी 3 : मसाला घाला. 

                       कांद्यामध्ये तिखट आणि हळद घालून थोडं परतून घ्या. परतून झाल्यानंतर त्यात कुस्करून घेतलेली कुड्याची भाजी टाका आणि मिश्रण एकजीव करा .

पायरी 4 : भाजी शिजवा. 

                       मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवा . त्यात पाणी ठेवून भाजी मध्यम आचेवर 10-15 मिनिटे शिजवा .

पायरी 5 : शेवट

                       झाकण काढून त्यात मीठ टाकून पुन्हा ढवळून घ्या .झाकणातील पाणी टाकून द्या . ते पाणी भाजीत टाकू नका . आता झाकण पुन्हा ठेवून भाजी वाफेने शिजू द्या . असं केल्याने भाजीचा स्वाद दुप्पट होतो .

कुड्याच्या शेंगांची तयारी |Chopping Kuda Sheng for Cooking


कुड्याच्या शेंगांची भाजी कशा सोबत खाल ?

                    जेवणात गरम भात , चपाती किंवा भाकरी असली तर ही भाजी त्यासोबत झणझणीत आणि स्वादिष्ट लागते .

आरोग्यदायी फायदे

पचनक्रिया सुधारते. 

रासायनिक खतांशिवाय निसर्गात उपलब्ध असलेली आणि शरीरास पोषक. 

आजीच्या आठवणींना उजाळा देणारी भाजी 

                       आजही कोकणामध्ये घरोघरी कुड्याच्या शेंगांची भाजी बनवली जाते . लहानपणी आजीच्या मागे मागे जंगलात फिरून आणलेल्या कुड्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याची आठवण तुम्हालाही येतेय का ? कुड्याच्या शेंगांची भाजी ही फक्त एक पाककृती नाही ,तर ती गावच्या आठवणींशी जोडलेली एक नाळ आहे .


तयार कुड्याच्या शेंगांची भाजी |Ready to Serve Kudyachi bhaji - Konkani Style


महत्वाच्या टिप्स :

जर शेंगा कोवळ्या असतील, तरच कुड्याच्या भाजीचा खरा स्वाद अनुभवता येतो .

भाजीला अधिक खमंग वास आणि चव येण्यासाठी लसूण थोडा जास्त वापरा .

भाजी मोकळी हवी असेल, तर पाणी अजिबात घालू नका .

FAQ :

1) कुड्याच्या शेंगांचा स्वाद कसा असतो ?

उत्तर - कुड्याच्या शेंगांचा स्वाद कडू व तुरट असतो .

2 ) कुड्याच्या शेंगांची भाजी शाकाहारी की अर्ध शाकाहारी लोक खातात ?

उत्तर - ही पूर्णपणे शाकाहारी भाजी आहे .

3 ) कुड्याच्या शेंगांची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ?

उत्तर -होय , कुड्याच्या शेंगांमध्ये फायबर ,औषधी गुणधर्म आणि पचनास मदत करणारे घटक असतात . ह्या शेंगा शरीरासाठी उपयुक्त मानल्या जातात .

निष्कर्ष :

                       कुड्याच्या शेंगांची भाजी ही फक्त एक पारंपरिक पदार्थ नाही , तर ती ग्रामीण संस्कृतीची ओळख आणि आठवणींचा ठेवा आहे . शेंगा बाजारात मिळाल्या तर लगेच घ्या आणि पारंपरिक पद्धतीने भाजी करून बघा - एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल . जर ही चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना शेअर करा . तसेच तुमच्याकडे कुड्याच्या शेंगांच्या भाजीची वेगळी पद्धत आहे का ? असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा .

हे ही वाचा :  करवंदांची आंबील  कशी बनवावी ?

                      कोकणातील तरुणांसाठी उत्तम व्यवसाय संधी -कमी गुंतवणूक करा ,जास्त नफा मिळवा 

गुरुवार, ५ जून, २०२५

श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ

 


श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ


श्रीवर्धन बीच कोकण - निसर्गरम्य  आणि लोकप्रिय समुद्रकिनारा


                         कोकण म्हणजे  निसर्ग सौंदर्य ,निळाशार समुद्र किनारा ,हिरव्यागार सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पारंपरिक संस्कृती यांचं अद्वितीय मिश्रण असलेलं भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत सुंदर किनारपट्टीवरील प्रदेश आहे . श्रीवर्धन हे निसर्गरम्य कोकणातील एक सुंदर ,शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे . हे कोकणातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी लोकप्रिय आणि मनाला भिडणारं पर्यटन स्थळ मानलं जात.हे केवळ त्याच्या स्वच्छ आणि नितळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही तर येथील महत्त्वपूर्ण मंदिरे आणि धार्मिक ठिकाणांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे .

                         या लेखात आपण श्रीवर्धनचा इतिहास ,नैसर्गिक सौंदर्य ,काय पाहावं ,काय खावं आणि कधी जावं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत .

श्रीवर्धन-कोकणाच शांत रत्न

                           श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील एक प्राचीन बंदर असून ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्वाचे ठिकाण आहे . तसेच ते ऐतिहासिक काळातील एक व्यापारी ठिकाण होते . हे ठिकाण 16-17 व्या शतकात अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होते . नंतर ते विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात होते . त्यानंतर हे ठिकाण जंजिऱ्याच्या सिद्दीच्या ताब्यात होते . पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे हे जन्मगाव आहे . पर्यटकांच्या दृष्टीने श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे येथील स्वच्छ ,निर्मळ आणि शांत समुद्र किनारा.


श्रीवर्धन बीच


श्रीवर्धन बीच कुठे आहे ?


                          श्रीवर्धन बीच हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे . हे ठिकाण मुंबईपासून सुमारे 173 किमी अंतरावर तर पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे साधारणत: 161 किमी अंतरावर आहे . अरबी समुद्राच्या किनारी वसलेला आणि कोकण किनारपट्टीवरील एक शांत ,अत्यंत निसर्गरम्य बीच आहे . पावसाळ्यात व हिवाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवळ पसरलेली असते . डोंगरदऱ्यांमधून जातानाचा प्रवास एक सुंदर अनुभव असतो .


श्रीवर्धन बीचचं सौंदर्य

                         श्रीवर्धन बीच बद्दल सांगायचे झाल्यास हा 3 किमी लांबीचा बीच असून तो सुरक्षित बीचमध्ये गणला जातो . येथे मऊशार वाळूवर चालण्याचा अनुभव अप्रतिम असतो . पश्चिमेकडून येणारा भन्नाट वारा अंगावर घेत किनाऱ्यावर केलेला वॉक म्हणजेच एक सुखद अनुभवच. सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे. येथील सुरुची बने आणि शांततापूर्ण वातावरण मनाला प्रसन्न करून टाकते. येथील रोठा सुपारी खूपच प्रसिद्ध आहे. संपूर्ण गावात पसरलेल्या नारळ पोफळीच्या बागा हे या ठिकाणाचं खास वैशिष्ट्य आहे. हे ठिकाण मुख्यतः मासळी, नारळ,सुपारी, फणस व काजू यासाठी प्रसिद्ध आहे.


श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्रकिनारा



काय कराल श्रीवर्धनमध्ये ?

1 ) बीचवर फेरफटका :

                             श्रीवर्धनमध्ये आल्याननंतर शांत आणि निवांत वेळ घालवायचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे बीचवर फेरफटका . येथे तुम्ही वॉक करू शकता , वाचन करू शकता ,योगा करू शकता आणि लाटांच्या आवाजात स्वत: ला विसरून जाता येतं. तसेच येथे सी फूडचा आनंदही घेता येतो .

2 ) बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्स :

                          या बीचवर विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा जसे की , जेट स्की राइड , बंपर राइड ,बनाना राइड आनंद घेता येतो . त्यामुळे अॅ ड व्हेंचर प्रेमींसाठी हे ठिकाण चांगला पर्याय आहे .

3 ) स्थानिक बाजार :

                      श्रीवर्धनच्या स्थानिक बाजारपेठेत विविध प्रकारचे स्थानिक खाद्य पदार्थ ,मासे , कोकम ,कैरीचे पदार्थ , मालवणी मसाले आणि रोठा सुपारी इत्यादी वस्तूंना भरभरून मागणी असते .

श्रीवर्धन बीच जवळची इतर ठिकाणे

1 ) हरिहरेश्वर ( 21 किमी ) :

                       श्रीवर्धन बीचपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेले हरिहरेश्वर हे एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे . या ठिकाणाला 'दक्षिण काशी' म्हणूनही संबोधले जाते . येथील प्राचीन शिवमंदिर आणि स्वच्छ ,शांत समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे . समुद्र ,डोंगर आणि धार्मिक वातावरण यांचा संगम असलेले हे ठिकाण आहे .

2 ) दिवेआगर (19 किमी ) :

                          हे ठिकाण श्रीवर्धन बीचपासून 20 किमी अंतरावर आहे . दिवेआगर हे गाव स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे . येथे नारळी- पोफळीच्या बागा सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात .येथील सुवर्ण गणेश मंदिर हे दिवेआगरचे प्रमुख आकर्षण आहे . येथे पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर चालणे आणि कोकणी जीवनशैलीचा आनंद घेता येतो . तसेच विविध वॉटर स्पोर्ट्सचाही मनसोक्त आनंद घेता येतो . येथील जेवण विशेषत : सीफूड जे स्थानिक कोकणी पद्धतीने बनवलेले ते पर्यटकांना खूप आवडते . कौटुंबिक सहलीसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

3 ) वेळास ( 26  किमी ) :

                       वेळास हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक शांत आणि निसर्गरम्य कोकणी गाव आहे . श्रीवर्धनवरून बागमंडला मार्गे येथे पोहोचता येते .येथील समुद्र किनारा शांत आणि स्वच्छ आहे . येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते . हे ठिकाण कासव संवर्धनासाठी ओळखलं जातं . प्रत्येक हिवाळ्यात ऑलिव्ह रिडली (Olive Ridley) कासवांची पिल्लं अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाताना पाहण्याचा आनंददायी अनुभव पर्यटक घेतात . दरवर्षी येथे कासव महोत्सव आयोजित केला जातो ,त्यामुळे या कालावधीत पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात.


Shrivardhan Beach


श्रीवर्धनमधील खाद्यसंस्कृती 

श्रीवर्धनमध्ये पारंपरिक कोकणी पद्धतीचे जेवण प्रसिद्ध आहे त्याचा तुम्हाला आस्वाद घेता येईल . सीफूड खाणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक पर्वणीच आहे .

खास पदार्थ :

बांगडा फ्राय

सुरमई फ्राय व कालवण

नारळ पोळी

आंबा पोळी

सोलकढी

कोकम सरबत

राहण्याची सोय 

                       रिसॉर्ट्स ,होमस्टे आणि गेस्ट हाऊसेस येथे राहण्याची सोय होऊ शकते . समुद्रकिनाऱ्याजवळ राहिल्याने सकाळी लाटांचा आवाज आणि समुद्राची साद ऐकत उठणं हा एक वेगळा अनुभव असतो .

कधी जाल श्रीवर्धनला ?

सर्वोत्तम वेळ : ऑक्टोबर ते मार्च

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे बीचवरील वॉटरस्पोर्ट्स मर्यादित असतात .

कसे पोहोचाल ?

गाडीने :

मुंबईहून मुंबई - गोवा महामार्ग (NH66) मार्गे - पनवेल - नागोठणे -माणगाव - श्रीवर्धन

पुण्याहून - ताम्हिणी घाट / वरंध घाट मार्गे श्रीवर्धन

रेल्वेने :

जवळचे स्थानक - माणगाव . तिथून पुढे बस / खासगी वाहन करून श्रीवर्धनला येता येते .

बसने :

एस . टी . बसेस श्रीवर्धनसाठी नियमितपणे असतात .


श्रीवर्धन बीच - कोकणातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ


का यावं श्रीवर्धनला ?

                       श्रीवर्धनमध्ये तुम्हाला शांतता , निसर्ग , इतिहास आणि कोकणी आत्मीयता या सगळ्यांचे सुंदर मिलन पाहायला मिळते . तुम्ही जर शहराच्या गर्दीतून आणि धावपळीतून दूर जावून स्वत: शी संवाद साधण्याचा विचार करत असाल , तर श्रीवर्धन हे ठिकाण एकदा तरी बघायला हवं.

निष्कर्ष :

                     कोकणाच्या कुशीत वसलेलं श्रीवर्धन बीच म्हणजे कोकणातलं एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे . दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात ,तरी सुद्धा इथली शांतता अबाधित राहिलेली आहे . जर तुम्ही विकेंड प्लॅनिंग करत असाल ,तर श्रीवर्धनचा नक्की विचार करा . एकदा आलात की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल - हे नक्की !

तुम्ही श्रीवर्धनाला कधी गेलात का ? गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता ? हे खाली कमेंट्स करून नक्की कळवा .