Pages

शनिवार, २९ जुलै, २०२३

भारंगी भाजी रेसिपी व औषधी उपयोग| Bharangi Benefits and Uses| भारंगी भाजी कशी बनवावी ?

 

भारंगी भाजी रेसिपी व औषधी उपयोग| Bharangi Benefits and Uses| भारंगी भाजी कशी बनवावी ?


Bharangi Bhaji


मित्रांनो आपण नेहमीच आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करत असतो. या भाज्यांपैकी काही भाज्या या शेतामध्ये उत्पादित केल्या जातात तर काही भाज्या या जंगलामध्ये आपोआपच उत्पादित होतात. पावसाळा सुरू झाला की अशाच अनेक प्रकारच्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि लोकही त्या आवडीने खातात. कारण या भाज्यांमध्ये शरीरासाठी मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. बऱ्याच लोकांना रानभाज्या कशा बनवाव्यात याची माहिती नसते. त्यामुळे असे लोक या रानभाज्या बनवून खात नाहीत. अशा लोकांसाठी आपल्या या वेबसाईटवर जंगलातील रानभाज्या कशा बनवाव्यात याबद्दलची माहिती मिळत राहणार आहे. अशाच एका रानभाजीची म्हणजेच भारंगी या रानभाजी बद्दलची माहिती व ती भाजी कशी बनवली जाते व तिचे औषधी गुणधर्म काय आहेत . याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमधून आपण पाहू या .
    भारंगी ही एक रानभाजी असून ती आपल्याला शेताच्या बांधावर ,खुरट्या जंगलात तसेच डोंगर उतारावर, नदी नाल्यांच्या काठावर पाहायला मिळते. या वनस्पतीचे झुडूप साधारणपणे तीन ते चार फुटांपर्यंत वाढते. ही वनस्पती व्हर्बेनेसी (Verbenaceae) या कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेरोडेंड्रम सिरेटम (Clerodendrum serratum) असे आहे . ही भाजी कोकणात मुबलक प्रमाणावर आढळते .

    Bharangi Bhaji


    वनस्पतीचे वर्णन

    या वनस्पतीच्या फांद्या चौकोनी स्वरूपाच्या असतात. तर पाने दोन्ही टोकाकडे निमुळती ,टोकदार आणि त्याच्या कडा कातरलेल्या असतात. तसेच साधी, समोरासमोर आलेली व लंबवर्तुळाकार स्वरूपात असतात. या वनस्पतीला फुले व फळे ही पावसाळ्याच्या अखेरीस येतात. फुले ही निळसर पांढरी असून ती फांदीच्या टोकावर मोठ्या पुंजक्याने आलेली असतात. पाकळ्या निळसर पांढऱ्या असतात तर त्यांचा खालचा भाग गर्द निळा असतो. तर फळे ही चार गोलाकार भागात विभागलेली गोल, चकचकीत अशी असतात . फळे ही काळसर जांभळी असून त्यामध्ये मांसल, काळसर रंगाच्या दोन चार बिया असतात.

    भारंगी भाजीचे औषधी गुणधर्म :

    1) भारंगीचे मूळ हे दम्याच्या आजारावर बेहडा व अडुळशाच्या पानांत टाकून त्याचा काढा बनवून प्यायला देतात.
    2) पोटात जंत झाल्यास भारंगीची पाने उकळून ते पाणी पिण्यासाठी देतात.
    3) ज्वर किंवा कफ असल्यास अशा आजारांवर भारंगीचे मूळ उपयोगी आहे .
    4) भारंगीची भाजी पाचक असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.
    5) दमा होऊ नये म्हणून भारंगीची भाजी खाल्ली जाते.
    6) पोट साफ न होणे , सर्दी ,खोकला,पोट जड होणे ,ताप, कफ घट्ट होणे ,तोंडाला चव नसणे अशा आजारांवर भारंगीची भाजी गुणकारी आहे .

    Bharangi Bhaji



    भाजी बनवण्याची पद्धत


    1)भारंगीच्या पानांची भाजी :

    साहित्य : भारंगीची कोवळी पाने, 2 कांदे, लसुण , मिरची पावडर ,हळद ,जिरे ,मोहरी ,तेल,मीठ इत्यादी

    कृती :

    प्रथम भारंगीची कोवळी पाने बारीक चिरून घ्या. नंतर एका पातेल्यात बारीक चिरून घेतलेली भाजी गरम पाण्यात पाच मिनिटे उकळून घ्या. उकळून घेतलेली भाजी थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर थंड झालेली भाजी हाताने व्यवस्थित पिळून घ्या. भाजी पिळून घेतल्यानंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यात लसूण, जिरे ,मोहरी टाकून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. त्यावर पिळून घेतलेली भाजी घालावी व वरुन मिरची पावडर ,हळद टाकून ते एकजीव करून घ्या . नंतर त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी व चवीनुसार मीठ टाकावे . पाच - दहा मिनिटे भाजी शिजवून घ्यावी .


    2)भारंगीच्या फुलांची भाजी :

    साहित्य : 2-3 वाट्या भारंगीची फुले ,2 कांदे ,लसूण , हिरवी मिरची , हळद, जिरे, मोहरी, तेल,मीठ , मुगडाळ इत्यादी .

    कृती :
    प्रथम फुले स्वच्छ पाण्याने धवून घ्या . नंतर गरम पाण्यात उकळून व पिळून घ्या. उकळून घेतलेली फुले पिळून घेतल्यानंतर कढईत तेल गरम करा व त्यात चिरलेला कांदा,जिरे . मोहरी व लसूण तेलात परतून घ्या . नंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची टाका .हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यात पिळून घेतलेली फुले व मुगडाळ टाका व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. वरुन झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवून घ्या . भाजी शिजून कमी होते . झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ टाका व पुनः झाकण ठेवून भाजी थोडावेळ शिजवून घ्या .

    निष्कर्ष :

    थोडक्यात सांगायचे झाले तर भारंगी ही रानभाजी शरीरासाठी बहुगुणी अशी रानभाजी आहे. ही भाजी सर्दी ताप ,दमा, खोकला ,पोट जड होणे ,पोटातील जंत अशा अनेक आजारांवर उपयोगी आहे. या वनस्पतीची केवळ पानेच उपयोगी नसून फुले आणि मुळे सुद्धा उपयोगी आहेत . एकंदरीत ही वनस्पती आपल्या शरीरासाठी बहुगुणी आहे.


    FAQ : Bharangi Benefits and Uses| भारंगी भाजी कशी बनवावी ?

    1) मी या वनस्पतीची लागवड घरी करू शकतो का ?
    _होय , या वनस्पतीची लागवड मुळांपासून व बियांपासून करता येते .

    2) भारंगीची भाजी सर्दी व कफ यावर गुणकारी आहे का ?
    _ होय , ही भाजी सर्दी व कफ यावर गुणकारी आहे .

    3) भारंगीची भाजी किती प्रकारे करता येते ?
    _ ही भाजी कोवळ्या पानांची व फुलांची अशा दोन प्रकारे करता येते .

    4) भारंगीची भाजी कोणकोणते पदार्थ टाकून केली जाते ?
    _ भारंगीची भाजी मुगडाळ व्यतिरिक्त चनाडाळ ,उडीद डाळ , तुरडाळ तसेच साल न काढता वाल सुद्धा टाकून छान बनवता येते .

    शुक्रवार, २८ जुलै, २०२३

    खेड्यात राहून पैसे कसे कमवावेत | खेड्यात राहून हे करा व्यवसाय | Village Business Ideas| How to earn money living in the village

     

    खेड्यात राहून पैसे कसे कमवावेत | खेड्यात राहून हे करा व्यवसाय | Village Business Ideas| How to earn money living in the village


    Village Business Ideas



                 मित्रांनो आपल्या भारत देशाचा विचार केला तर आपल्या देशातील बहुसंख्य लोकसंख्या ही खेड्यांमधून राहते. खेडेगाव म्हटले की तिथे शेती हा व्यवसाय आलाच. याच शेती व्यवसायातून आपण अनेक प्रकारचे जोड व्यवसाय निर्माण करून खेडेगावात राहूनच भरपूर पैसा कमावू शकतो. आजही खेड्यातील अनेक लोक रोजगार नाही म्हणून कुटुंबासहित शहरांमध्ये स्थलांतरित होताना दिसतात. शहरांमध्ये गेल्यावरही तेथे सुद्धा कमी पगारामध्ये कुटुंबाचा खर्च भागवताना नाकीनऊ येते . तसेच खेड्यात राहणारे बहुतेक लोक हे मोल मजुरी करून कुटुंबाचा कसा तरी उदरनिर्वाह करत असतात. परंतु खेडेगावात राहून पैसे कमावण्याचे मार्ग (How to earn money living in the village) मात्र माहीत नसतात.आजच्या या लेखात जे लोक गावात राहून काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारे काही उत्तम मार्ग सांगणार आहोत.


    1) नारळाच्या करवंट्या विकण्याचा व्यवसाय :


    Village Business Ideas


                 जेव्हा आपण घरी नारळ आणून फोडतो आणि त्यातील खोबरे काढून करवंटी कचऱ्यात फेकून देतो. बाहेर पर्यटनासाठी गेल्यावर नारळ पाणी पितो आणि त्याचे कवच फेकून देतो. परंतु आता मात्र याच करवंटयांना मार्केटमध्ये खूपच मागणी आलेली आहे असे दिसून येते. या करवंटयांची विक्री आता ऑनलाइन (online selling ) केली जात आहे. विदेशी साइट्सवर या करंट्यांना प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन साइट्सवर या नारळाच्या करवंटयांची किंमत 100 रुपयांपासून पुढे पाहायला मिळते. त्यामुळे या करवंटयांची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोक या करवंट्या कशासाठी खरेदी करत असावेत ? तर मित्रांनो या करवंटीचा उपयोग वाटी म्हणून केला जातो. तसेच करवंटीवर डिझाईन करून सजावटीसाठी किंवा शोभेच्या वस्तू म्हणून केला जातो. त्यामुळे या करवंट्या लोक विकत घेत आहेत.

    2) चिंचोके विकण्याचा व्यवसाय :

                    चिंच म्हटली की लगेच तोंडाला पाणी सुटते. पण आज चिंचेचा व्यवसाय सुद्धा केला जातो. आपण चिंच खाल्ल्यानंतर त्यांतील बिया म्हणजेच चिंचोके फेकून देतो. याच चिंचोक्याला एकेकाळी काहीच किंमत नव्हती. परंतु आता मात्र याच चिंचोक्यानी बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवले आहे. कारण याच चिंचोक्याचा वापर आता विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यामध्ये जनावरांसाठी खाद्य तयार करणे, चिंचोक्याच्या आतील पांढरा भाग कापड उद्योगात कापड मजबूत करण्यासाठी वापरला जातो. तसेच चिंचोक्याची पावडर डाईंगसाठी वापरली जाते.त्याचबरोबर आईस्क्रीम, जाम , सॉफ्ट ड्रिंक्स , सूप अशा अन्नपदार्थांमध्ये सुद्धा वापर केला जातो. त्यामुळे चिंचोक्या भाव क्विंटल मागे सुमारे 2000 रु च्या पुढे असतो. फॅशन उद्योगामुळे या व्यवसायाला खूपच चांगले दिवस आले आहेत.

    3) शेणापासून डास प्रतिबंधक ( अगरबत्ती) तयार करण्याचा व्यवसाय :


    Village Business Ideas


                      कमी खर्चाचा आणि जास्त पैसे मिळवून देणारा हा चांगला व्यवसाय आहे. जर तुमच्याकडे गाय, बैल अशी जनावरे असतील तर किंवा शेण विकत घेऊन तुम्ही शेणापासून डास प्रतिबंधक कॉइल तयार करून विकू शकता. शेणापासून तयार केलेल्या कॉइलमुळे लहान मुलांच्या तसेच प्रौढ माणसांच्या श्वसनसंस्थेवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. त्यामुळे या कॉइलला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे . तसेच गोमूत्र कर्क रुग्णांसाठी वापरला जातो. त्यामुळे त्यालाही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच शेणापासून विविध साईजच्या व सेपच्या गोवऱ्या तयार करून तुम्ही ऑनलाइन ( online selling )विकू शकता.

    4) कृषी पर्यटन व्यवसाय ( agritourism Business ) :

                     अलीकडच्या काळात भरभराटीस आलेला हा एक उत्तम व्यवसाय आहे. आजचा विचार केला तर दिवसेंदिवस वाढत चाललेली शहरे आणि त्या शहरांमध्ये राहणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या लोकांचे असलेले बंदिस्त जीवन आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अडकून पडल्यामुळे हे लोक बाह्य निसर्गापासून दूर आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनाचा आनंद देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यास शेती या व्यवसायाबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत तयार करू शकता. यामधून तुम्ही शहरातील लोकांसाठी हॉटेलिंग ,मनोरंजन, ग्रामीण लोकांचे दैनंदिन जीवन ,शेतीच्या कामाचा अनुभव देणे , पाळीव प्राण्यांच्या संबंधित कामांचा अनुभव देणे ,स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव देणे , शेतातील ताजी उत्पादने विक्री करणे अशा अनेक गोष्टींमधूनअर्थार्जन करू शकता.

    5) पशुपालन व्यवसाय :


    Village Business Ideas


                        भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक शेती हा व्यवसाय करत आहेत. हे लोक पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत. परंतु शेतीबरोबरच पशुपालन हा व्यवसाय केला तर शेती या व्यवसायास जोड व्यवसाय म्हणूनअर्थार्जन करून देणारा एक उत्तम व्यवसाय आहे. शेतीसाठी जरी पशुधनाचा पूर्वीप्रमाणे उपयोग होत नसला तरी गाई व म्हशी यांच्या किंमती वाढताना आपण पाहत आहोत. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे दुधाची सुद्धा मागणी वाढत आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांचे महत्त्व वाढलेले आहे. दुधापासून लोणी , तूप असे अनेक पदार्थ तयार करता येतात आणि या पदार्थांना मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. त्याचबरोबर मांसाहार घेणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये मटणाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. म्हणून घराच्या मागे किंवा पुढे मोकळ्या जागेवर एक-दोन जनावरे पाळता येतात.

    6) वाहतूक सेवा :

                           आपण जर खेडेगावात राहत असाल आणि आपल्या गावातून शहराकडे जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा नसेल तर तुमच्यासाठी हा एक नवीन व्यवसाय करण्याची संधी आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला थोडी गुंतवणुकीची गरज आहे. हा व्यवसाय करण्याचा जर विचार करत असाल तर एखादा पीक-अप घेऊन हा व्यवसाय करू शकता. या व्यवसायामध्ये अजून तुम्ही कार भाड्याने देणे, कुरियर सेवा ट्रक वाहतूक सेवा ,मुलांसाठी स्कूल बस सेवा ,रिक्षा सेवा ,दूधवाहतूक, किराणा वाहतूक आशा अनेक प्रकारच्या सेवा देऊन प्रचंड पैसा कमावू शकता.

    7) किराणा दुकान :

                                 जर तुम्ही खेडेगावात राहत असाल आणि तुमच्या गावात जर किराणामालाचे दुकान नसेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे पैसे कमाविण्याचा. या व्यवसायासाठी तुमच्याकडे जागा आणि पैशांची गुंतवणूक करण्याची तयारी असली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण जगात किराणा मालाचे दुकान चांगला पैसा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून गणला जातो. तुम्ही तुमच्या दुकानामध्ये विविध प्रकारच्या योजना आखून तुमच्या गिऱ्हाईकांना आकर्षित करून त्यांना चांगली सेवा देऊन चांगले पैसे कमवू शकता .

    8) हळद लागवड व पावडरचा व्यवसाय :

                              भारत हा जगातील सर्वाधिक हळदीचे उत्पादन देणारा देश गणला जातो. जगात एकूण हळदीपैकी 80% हळद ही भारतात तयार होते. महाराष्ट्रातील वातावरण या पिकासाठी अनुकूल असल्यामुळे व्यवसाय करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही हळदची योग्यवेळी लागवड,सुधारित बियाणे रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर त्याच बरोबर पाण्याचे योग्य नियोजन व्यवस्थापन केल्यास हळदीचे अधिक उत्पादन मिळते. जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर किंवा भाड्याने जमीन घेऊन हा व्यवसाय तुम्ही करू शकता. तुम्ही जर मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेत असाल तर उत्पादित केलेली हळद ग्राइंडिंग मशीनच्या सहाय्याने दळून तिची प्रतवारी करून तसेच पॅकेट तयार करून ते पॅकेट मार्केटमध्ये विकून चांगला पैसा कमावू शकता.

    9) मिरची पावडरचा व्यवसाय :

                                    भारतीय आहार पद्धतीत मिरची पावडर हा प्रत्येक घरात वापरला जाणारा पदार्थ असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असणारा हा व्यवसाय भरपूर पैसा मिळवून देतो. मिरची पावडरसाठी स्थानिक पातळीवर भरपूर गिराईक व बाजारपेठ सहज मिळून जाते. ग्रामीण भागात तसेच शहरी भागात सुद्धा अनेक महिला या व्यवसायात कार्यरत आहेत. हा व्यवसाय करून तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवून बाजारात लॉन्च करून वर्षातील बाराही महिने तुम्हाला या व्यवसायासाठी गिराईक मिळून जातो. या व्यवसायासाठी तुम्हाला कांडप मशीन , पॅकिंग मशीन अशी यंत्रसामग्री उपलब्ध करण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फर्म रजिस्ट्रेशन, जीएसटी रजिस्ट्रेशन,FSSAI,IEC code ,MSME/SSI, ट्रेडमार्क, एगमार्क बी आय एस प्रामाणिकरण, ट्रेड लायसन्स अशा अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. परंतु हा व्यवसाय तुम्हाला 50 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत फायदा मिळवून देतो.

    10) लोणचे बनवण्याचा व्यवसाय :


    Village Business Ideas


                                      मित्रांनो लोणचे हा असा एक स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे जो की ,आपले जेवण स्वादिष्ट बनवतो. जवळपास सर्वच घरांमध्ये आपल्याला लोणचे पाहायला मिळते. बऱ्याच घरांमधून लोक स्वतःसाठी लोणचं बनवत असतात यावरून लोणच्याची मागणी किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्या लक्षात येते. काही लोकांना लोणचे खायला खूप आवडते परंतु बनवता येत नाही. म्हणून असे लोक बाजारातून लोणचे खरेदी करतात. जर तुम्ही लोणचे बनवून बाजारात विकले तर चांगले पैसे कमवू शकता. लोक स्वतः घरी लोणचे बनवतात यावरून लोणचे बनवण्याची प्रक्रिया फारशी अवघड नाही. त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही सुद्धा सुरू करू शकता. फक्त त्याची माहिती असायला हवी. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील सदस्यांच्या मदतीने हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करू शकता. लोणच्याचे अनेक प्रकार असतात जसे की लिंबूचे लोणचे ,मिरचीचे लोणचे ,आंब्याचे लोणचे करवंदाचे लोणचे, कोबीचे लोणचे ,लसुणचे लोणचे , गाजराचे लोणचे ,मिश्र भाजीचे लोणचे अशा अनेक प्रकारचे लोणचे तुम्ही तयार करू शकता. व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला नोंदणी आणि परवाने घ्यावे लागतात. हा व्यवसाय तुम्ही 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून सुद्धा सुरू करू शकता.

    11) मिनी ऑइल मिलचा व्यवसाय(How to start mini oil mill) :

                                           स्वयंपाक करायचा म्हटलं तर तेलाची आवश्यकता असते. आपल्या देशामध्ये प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरले जाते. या तेलामध्ये सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल ,मोहरीचे तेलअशा अनेक खाद्य तेलांचा तसेच केसांना लावायचे तेल अशा अनेक तेलांचा समावेश होतो. आता या तेलांपैकी कोणत्या तेलाचे उत्पादन घ्यायचे हे प्रथम आपण ठरवले पाहिजे. त्यानंतर कच्चामाल आणि मशनरी खरेदी करून हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्ही तुमच्याकडचे भांडवल गुंतवू शकता किंवा सरकारी योजनांचा लाभ घेऊन गुंतवणूक करून हा व्यवसाय चालू करू शकता . कच्चा माल मिळवण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांशी संपर्क करू शकता . हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला विविध परवाने व प्रमाणपत्रे मिळवावे लागतात तसेच या व्यवसायाची मार्केटिंग तुम्ही online तसेच offline पद्धतीने करून चांगला पैसा कमवू शकता .

    12) कुक्कुट पालन व्यवसाय :

                                        मित्रांनो सध्या बाजारात चिकनला आणि अंड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जर तुम्ही गावाठिकाणी राहात असाल तर तुमच्यासाठी पैसे कमावण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. कारण गावात फार कमी लोक अशा प्रकारचा व्यवसाय करत असतात. हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे पोल्ट्री फार्म आणि घरगुती गावठी कोंबड्या पालन असेदोनपर्यायअसतात.या व्यवसायासाठी जास्त जागेची गरज लागत नाही. अगदी कमी जागेतही हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्ही मार्केटमध्ये चिकन शॉपमध्ये कोंबड्या व अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

    13) भाजीपाला लागवड :


    Village Business Ideas


                                            जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल आणि चांगला नफा मिळवायचा असेल तर यासाठी भाजीपाला लागवड हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तेथे मोठ्या प्रमाणावर भाजी लागवड करण्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत. वाढत्या लोकसंख्येमुळे भाजीपाल्याला बाजारपेठेत प्रचंड मागणी दिसून येते. या व्यवसायासाठी चांगल्या प्रतीची बियाणे ,खते ,औषधे यांचा योग्य प्रकारे वापर करून मोठ्या प्रमाणावर भाजीचे उत्पादन घेता येते. हा व्यवसाय तुम्हाला दुप्पट नफा देणारा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही.

    14) भाजीपाला विकण्याचा व्यवसाय :

                                            जर तुमच्याकडे भाजी लागवडीसाठी पुरेशी जमीन नसेल तर तुम्ही आठवडा बाजारात किंवा भाजीचा लिलाव जेथे होतो तेथे जाऊन तेथे येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून तो पुन्हा इतर भाजी विक्रेत्यांना विकणे हा अतिशय सोपा व जास्त नफा मिळवून देणार व्यवसाय करू शकता . हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी गुंतवणूक करण्याची तयारी हवी तसेच भाजीपाला खरेदी विक्री करण्याचे कौशल्य आवश्यक आहे. जरी हे कौशल्य तुमच्यात नसले तरी ते हळूहळू तुमच्यामध्ये आत्मसात होईल आणि भविष्यात तुम्ही चांगला पैसा कमाऊ शकता .

    15) पिठाच्या गिरणीचा व्यवसाय :

                                            भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे खेड्यातील जास्त लोक शेती या व्यवसायात गुंतलेले पाहायला मिळतात . खेड्यात बहुत शेतक-याच्या घरी न्याहारी म्हटली की भाकरी ही आलीच आणि भाकरी म्हटली की पीठ हे आलचं. बऱ्याच ठिकाणी लोक बाजारातून पीठ विकत न आणता धान्य गिरणीवरच दळतात . तुम्ही जर पीठ गिरणी विकत घेऊन हा व्यवसाय गावात सुरू केला तर महिन्याला 15-20 हजार सहज कमवू शकाल . त्यासाठी तुम्हाला पीठ गिरणी विकत घेण्यासाठी 35- 45 हजारपर्यंत गुंतवणूक करावी लागेल व वीज परवाना मिळवावा लागेल. गावात राहूनही या व्यवसायातून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकता .

    16) डेकोरेशनचा व्यवसाय(decoration Business ) :

                                                    आजकाल तुम्ही पाहात असाल कुठलाही कार्यक्रम म्हटलं की सजावट आलीच.मोठ मोठ्या शहरांमधून लग्नसुद्धा हॉलवरच लावली जातात . तिथे आपण decoration केलेले पाहातो. मग अशाच पद्धतीचा किंवा कमी बजेट असलेला सेट खरेदी करून तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकता . खेडेगावाचा विचार केला तर आजही गावागावात घरोघरी लग्न होताना दिसतात . अशावेळी जर तुम्ही मंडपाचा सेट आणि D J सेट खरेदी करून व्यवसाय सुरू केला तर चांगली कमाई करू शकता .

    17) पापड तयार करण्याचा व्यवसाय :


    Village Business Ideas


                                              पापड हा लोणच्या प्रमाणेच घराघरांतून दिसणारा आणि सर्वांनाआवडणारा पदार्थ आहे. परंतु बऱ्याच लोकांना धावपळीमुळे घरी पापड बनवायला वेळ नसतो. त्यामुळे असे लोक बाजारातून पापड खरेदी करत असतात. या पदार्थाला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून येते. त्यामुळे काही लोक घरबसल्या पापड तयार करून थेट ग्राहकांना विकतात. तुम्ही जर तुमच्या परिसरातील पापड खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या विचारात घेऊन हा व्यवसाय चालू केला आणि तयार केलेले पापड थेट तुमच्या परिसरातील ग्राहकांना विकले तर तुम्ही सुद्धा घरबसल्या मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकता. हा व्यवसाय तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मिक्सर आणि ग्राइंडर, पॅकिंग मशीन, पापड प्रेस मशीन ,पापड सुकवन्याचे यंत्र अशा गोष्टींसाठी थोडीफार गुंतवणूक करावी लागेल. पण एकदा का या व्यवसायात तुमचा जम बसला की तुम्ही या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करू शकता.

    18) मासे पालन व्यवसाय :

                                              मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की संपूर्ण जगामध्ये आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांच्या अन्नाची गरज भागवणे हे तितकेच मोठे आव्हान असते. जर तुम्ही एखाद्या मच्छी मार्केटमध्ये गेलात आणि तिथे मच्छीचा भाव विचारला तर तुमच्या लक्षात येईल की माशांचे भाव हे किती गगनाला भिडलेले असतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये माशांना किती मागणी आहे. त्यामुळे आजच्या काळात मासेपालन हा व्यवसाय प्रतिष्ठितआणि लघु उद्योग म्हणून गणला जातो. माशांचा केवळ अन्न म्हणूनच उपयोग केला जात नाही तर खतांसाठी व औषध तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे हा व्यवसाय करून चांगला पैसा कमावता येतो. मासेपालन व्यवसायात टाकी किंवा तलाव बांधून त्यामध्ये मासे पाळून त्यांना खाद्य घातले जाते व त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. पाळलेले मासे पुरेसे मोठे झाल्यावर ते पकडून बाजारात विकून चांगला नफा मिळवता येतो. या व्यवसायासाठी जास्त भांडवल लागत नाही. कमी खर्चामध्ये हा व्यवसाय सुरू करून तुम्ही 8 ते 10 पट पर्यंत नफा मिळवू शकता.

    19) मधमाशी पालन व्यवसाय :

                                             मध ही खाण्यासाठी व औषध निर्मितीमध्ये वापरली जाते. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की मध हा घटक किती महत्त्वाचा आहे.मधमाशीपालन या व्यवसायाचा समावेश फायदेशीर व्यवसायांच्या यादीत केला जातो. गावातील शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येतो. या व्यवसायामध्ये तुम्ही जास्त पैसा न गुंतवता अगदी लहान प्रमाणावर किंवा मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरु करून भरपूर पैसे कमावू शकता. तसेच उत्पादित झालेली मध मार्केटिंग करून विकू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला परवाने आणि नोंदणी करण्याची आवश्यकता असते. पण एक मात्र नक्की की, एकदा हा व्यवसाय चालू केला की दरवर्षी दोन ते तीन पटीने वाढत जाणारा हा व्यवसाय आहे आणि त्या पटीने पैसाही मिळवून देणारा आहे .

    20) यूटयूबर (Youtuber ) बना :

                                              मित्रांनो प्रत्येक माणसामध्ये काही ना काही तरी कलागुण असतात. हेच कलागुण तुम्ही तुमचे पैसे मिळवून देण्याचं साधन बनवू शकता. होय , तुम्ही तुमच्या अंगातील कलागुणांच्या माध्यमातून किंवा तुमच्याकडे असलेल्या स्किल्स, टॅलेंटचा वापर करून यूट्यूबच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमावू शकता. त्यासाठी तुमच्याकडे फक्त एक अँड्रॉइड मोबाईलची गरज आहे. तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तर तुमच्या परिसरात असलेली ऐतिहासिक ठिकाणे,पर्यटन स्थळे, किल्ले अशा अनेक गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवर अपलोड करून प्रचंड पैसा मिळू शकता. महिलासुद्धा विविध प्रकारचे कुकिंगचे व्हिडिओ तयार करून चांगले अर्थार्जन करू शकतात.


    निष्कर्ष :

    या लेखात आपण खेड्यात राहून पैसे कसे कमवावे किंवा कमवता येतील. त्यासाठी कोणकोणते व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आमचा हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना आवश्य शेअर करा.

    हेही वाचा - खेकडा पालन व्यवसाय |crabfarming |खेकडा शेती एक उत्तम व्यवसाय


    FAQ -

    1) लोणचे बनवण्याचा व्यवसाय फायदेशीर आहे का ?

    _ होय , लोणच्याची मागणी बाजारात जास्त आहे . शिवाय या व्यवसायसाठी खर्च कमी येत असतो. त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर आहे .

    2) कमी खर्च येणारे कोणकोणते व्यवसाय करू शकतो ?

    _ कमी खर्च येणाऱ्या व्यवसायांमध्ये नारळाच्या करवंटया विकणे ,चिंचोके विकणे ,शेणापासून डास प्रतिबंधक तयार करणे ,कृषी पर्यटन असे व्यवसाय करू शकता .

    3) सध्यातरी जास्त नफा मिळवून देणारा कोणता व्यवसाय करू शकतो ?

    _ सध्यातरी किराणा मालाचे दुकान जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून गणला जातो .


    शनिवार, २२ जुलै, २०२३

    कोळूची रानभाजी |कोळीची भाजी|फोडशी रानभाजी|Kulichi bhaji Recipe in marathi | How to make Phodshi bhaji

     

    कोळूची रानभाजी|फोडशी रानभाजी|Kulichi bhaji Recipe in marathi|How to make Phodshi bhaji 

    Phodshi Ranbhaji
    Phodshi Ranbhaji



    पावसाळा सुरू झाला की , बाजारात रानभाज्यांची रेलचेल सुरू होते . रानभाज्या या मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाहायला मिळतात . ग्रामीण भागातील महिला या रानभाज्या बाजारात किंवा रस्त्याच्या कडेला विकत बसलेल्या आपण बघितलेल्या असतील .बहुतेक रानभाज्या कश्या बनविल्या जातात हे माहीत नसते . त्याबद्दलही या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती मिळत राहील . आज आपण या लेखात कोळूची भाजी किंवा Phodshi chi Bhaji या रानभाजीबद्दल माहिती व ती कशी बनवली जाते हे पाहणार आहोत .

      तर कोळूची भाजी ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते . जसे की कोळीची भाजी,फोडशी ,कुलू ,काल्ला,सफेद मुसळी ,कोवळी भाजी इत्यादी . ही भाजी लांबट पाती असलेली गवतासारखी असते . ही भाजी फक्त पावसाळ्यात माळरानावर , डोंगर उतारावर तसेच उघड्या जागेवर येते . या भाजीचे शास्त्रीय नाव chlorophytum borivilianum Santapau & Fernandes असे असून ती लिलीयाशी (LIliaceae) या कुळातील आहे . या भाजीला इंग्रजीत chlorophytum ,White Musali किंवा Indian Spider Plant तर हिंदीत ढोली मुसली ,मुसली , सफेद मुसली अशा विविध नावांनी ओळखले जाते . तर संस्कृतमध्ये श्वेत मुसली,मुसली असे नाव आहे . ही वनस्पती राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्र राज्यात आढळते. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ही वनस्पती कोकण, मराठवाडा ,विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम घाटात आढळते.

      1) कोळू रानभाजीचे वर्णन :

      या वनस्पतीचा जमिनीत छोटासा कंद असतो. दोन ते तीन पावसानंतर जमिनीत असलेल्या कंदाला कोंब फुटायला सुरुवात होऊन वनस्पती वाढायला सुरुवात होते. या कंदाला सभोवताली पांढरी, लांबट, दंडगोलाकार मुळे फुटलेली असतात. कंदावर साधारणपणे 10 ते 12 पर्यंत लांबट टोकदार पाती असलेली पाने असतात. जुलै -ऑगस्ट महिन्यामध्ये या कंदावर पांढरीशुभ्र लांबट गोलाकार व मऊ फुले येतात. सप्टेंबर महिन्यापर्यंत या कंदावर फळे तयार झालेली दिसायला लागतात. फळांमध्ये गोलाकार व काळ्या रंगाच्या बिया असतात. हिवाळ्यात या वनस्पतीची पाती सुकायला सुरुवात होते. ही वनस्पती पूर्णपणे सुकल्यानंतर पावसाळ्यापर्यंत तिचा कंद सुप्त अवस्थेत जमिनीतच राहतो.

      Phodshi Ranbhaji
      Phodshi Ranbhaji

      2) कोळू रानभाजीचे औषधी गुणधर्म :

      1) या वनस्पतीमध्ये प्रोटीन ,कार्बोहायड्रेट्स आणि खनिजद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात . 

      2 ) या वनस्पतीची मुळे युनानी ,आयुर्वेद , होमिओपॅथी आणि एॅलोपॅथी या सारख्या औषधांमध्ये वापरली जातात . 

      1 ) या वनस्पतीमध्ये सॅपोजिनाईन हा उत्तेजक घटक असून त्याचा उपयोग शक्तिवर्धक टॉनिक म्हणून केला जातो

      2 ) दमा ,मूळव्याध , कावीळ ,लघवीची जळजळ ,पोटदुखी ,अधिक मासिकस्राव, अतिसार अशा आजारांवर मूळयांचा उपयोग केला जातो .

      3 ) शुक्र जंतु व शुक्रोत्पादन वाढीस मदत होते .

      4 ) लहान मुलांना दूध पाजणाऱ्या माताना दूध वाढीसाठी उपयुक्त आहे .

      5 ) या वनस्पतीमध्ये चरबीचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेहींना उपयोगी आहे .

      महत्वाची टीप : ही भाजी जंगलात काढताना माहीतगार व्यक्तीची मदत घेऊनच काढावी . या भाजी सारख्या दिसणाऱ्या काही भाज्या जंगलात असतात , त्यामुळे त्या विषारी असू शकतात .
      Phodshi Ranbhaji
      Phodshi Ranbhaji


      3) कोळू रानभाजी बनवण्याची पद्धत :


      टीप : ही भाजी मुगडाळ ,तुरडाळ किंवा चणा डाळ यामध्येही छान प्रकारे करता येते .


      साहित्य : 2-3 जुडया कोवळी / कोळू भाजी, 2-3 कांदे , लसूण ,हिरवी मिरची ,तेल , जिरे ,मोहरी ,मीठ

      कृती : प्रथम भाजी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. त्यानंतर ही भाजी बारीक कापून घ्यावी. पाठीमागचा पांढरा भाग कापून टाकून द्यावा.नंतर ती पातेल्यात गरम पाण्यात उकळून घ्यावी. भाजी उकळून घेतल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्यावी. भाजी थंड झाल्यानंतर ती हाताने पिळून घ्यावी. भाजी पिळून घेतल्यानंतर पातेल्यात किंवा कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी टाकावी. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकून मंद आचेवर शिजू द्यावा . त्यानंतर त्यात हिरवी मिरची व लसूण टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेली भाजी टाकून पाच-सहा मिनिटे शिजवून त्यात चवीनुसार मीठ टाकून वर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने भाजी खाण्यासाठी तयार होते.
























      रविवार, १६ जुलै, २०२३

      बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र राज्य (आदिवासी शेतकऱ्यांसाठीची योजना )

       

      बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र राज्य

      (आदिवासी शेतकऱ्यांसाठीची योजना )


      Birsa Munda Krishi Kranti Yojana

      शेती म्हटलं की पाणी हे आलंच. पाण्याशिवाय शेती करणं ही अवघड गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास काही भागात तीव्र टंचाई आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी राजाला अनेक संकटांना सामोरे जाताना आपण पाहात आहोत. शेतकऱ्यांना जर मुबलक सिंचनाची साधने उपलब्ध करून दिली तर शेतीतील उत्पादन वाढून त्यांचे आर्थिक उत्पन्नही वाढण्यास मदत होईल. याचा विचार करता शेतीसाठी जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ कोरडवाहू शेतकऱ्यांना मिळणार आहे. जे शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात त्यांच्यासाठी ही योजना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. या योजने मार्फत राज्य सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना कमी पाण्याच्या शेतातून जास्त उत्पन्न मिळवता येणार आहे . या योजनेमुळे आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास नक्कीच हातभार लागणार आहे.

      बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत असलेल्या योजना


      1) नवीन विहीर बांधकाम

      2) जुनी विहीर दुरुस्ती

      3 ) इनवेल बोअरिंग

      4) पंप संच

      5) वीज जोडणी आकार

      6) शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण

      7 ) ठिबक सिंचन संच

      8 ) तुषार सिंचन संच

      9 ) पीव्हीसी पाईप

      10 ) परसबाग

      वरील सर्व बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.

      टीप : ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,सातारा ,सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे वगळून महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

      राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान

      1) नवीन विहीर बांधकाम -रु. 2.50 लाख

      2) जुनी विहीर दुरुस्ती- रु . 50 हजार

      3 ) इनवेल बोअरिंग - रु . 20 हजार

      4) पंप संच- रु . 20 हजार

      5) वीज जोडणी आकार-रु 10 हजार

      6) शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण - रु . 1 लाख

      7 ) ठिबक सिंचन संच- रु . 50 हजार

      8 ) तुषार सिंचन संच- रु . 25 हजार

      9 ) पीव्हीसी पाईप- रु . 30 हजार


      10 ) परसबाग- रु . 500

      या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता

      1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

      2) लाभार्थी शेतकऱ्याकडे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

      3) जमिनीचा ७ /१२ व ८-अ उतारा सादर करणे बंधनकारक आहे.

      4 ) लाभार्थी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. १ ,५ ०,००० पर्यंत असावी.

      5 ) लाभार्थी शेतकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला

      6 ) लाभार्थी शेतकऱ्यांची जमीनधारणा - ०. २० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत ( नवीन विहिरीकरीता ०.४० हेक्टर ) असणे बंधनकारक आहे.

      7 एकदा संबंधित योजनेचा लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थी शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास या योजनेचा लाभ देय असणार नाही.

      या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

      नवीन विहीर बांधकाम आवश्यक कागदपत्रे

      1 ) उत्पन्नाचा दाखला

      2 ) सातबारा  व ८ -अ चा उतारा

      3 ) जातीचा दाखला

      4 )रुपये शंभर /पाचशे च्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र

      5 ) क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र( कृषि अधिकारी यांचेकडील असावे )

      6 ) अपंग असल्यास प्रमाणपत्र

      7 ) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला

      8) गटविकास अधिकारी यांचे शिफारसपत्र

      9 ) ग्रामसभेचा ठराव


      10 ) ज्या जागेवर विहीर बांधायची आहे त्या जागेचा फोटो ( महत्वाच्या खुणे सहित व लाभार्थी सहित )

      11 ) तलाठी यांचे कडील विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र

      जुनी विहीर दुरुस्ती व इनवेल बोअरिंग आवश्यक कागदपत्रे

      1 ) जातीचा दाखला

      2 ) ) उत्पन्नाचा दाखला

      3) सातबारा व ८ -अ चा उतारा

      4 ) ग्रामसभेचा ठराव

      5 ) तलाठी यांचे कडील विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र

      6) लाभार्थीचे बंध पत्र (१०० /५०० च्या स्टॅम्प पेपरवर )

      7 ) क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र (कृषी अधिकारी यांचेकडील असावे)

      8 ) गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र

      9 ) अपंग असल्यास प्रमाणपत्र

      10 ) जुन्या विहिरीचा व इनवेल बोअरिंगचा काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो विशिष्ट खुणांसहित लाभार्थ्यासह

      11 ) इनवेल बोअरिंग साठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा रिपोर्ट


      शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे तसेच वीज जोडणी आकार आणि सूक्ष्म सिंचनासाठी आवश्यक कागदपत्रे

      1 ) जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र

      2 ) उत्पन्नाचा दाखला ( मर्यादा रु . १,५०,००० पर्यंत ) किंवा दारिद्र्यरेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा BPL कार्ड ( लागू असल्यास)

      3 ) ८ -अ आणि ७ /१२ चा उतारा

      4 ) तलाठी यांचे कडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला ( मर्यादा ०.२० ते ६ हेक्टर )

      5 ) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो

      6 ) ग्रामसभेची मंजुरी किंवा शिफारस पत्र

      7 ) शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वा बाबतचे हमीपत्र ( १०० / ५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर )

      8 ) विद्युत कनेक्शन व विद्युत पंप संच नसल्याबाबतचे हमीपत्र

      9 ) योजनेचा लाभ न घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र

      10 ) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकित प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांचेकडील अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करून घ्यावे.

      महत्त्वाचे : अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्या. तसेच जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.